बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Updated: December 26, 2024 00:06 IST2024-12-26T00:05:15+5:302024-12-26T00:06:03+5:30
दुसरा आराेपी फरार : लातूर न्यायालयात केले हजर

बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील आयकाॅन रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. प्रमाेद घुगे याला बाळू डाेंगरे खून प्रकरणात लातूर पाेलिसांनी हरिद्वार (उत्तराखंड) येथे अटक केली. त्याला बुधवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील जुना रेणापूर नाका, बसस्थानक क्रमांक - २ लगत असलेल्या आयकाॅन हाॅस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या बाळू भारत डाेंगरे (वय ३५, रा. इंडियानगर, लातूर) यास डाॅ. प्रमाेद घुगे आणि अनिकेत मुंडे या दाेघांनी जबर मारहाण केली. यामध्ये कर्मचारी बाळू डाेंगरेचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेबाबत डाॅ. घुगे याने बनाव करत शिवाजीनगर पाेलिस ठाण्याला माहितीचे पत्र दिले. संतप्त नातेवाइकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. लातूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेनानंतर हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समाेर आले. शवविच्छेदन अहवालानानंतर पाेलिसही चक्रावून गेले.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डाॅ. प्रमाेद घुगे, अनिकेत मुंडे यांच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून दाेघेही वास्तव्याची ठिकाणे बदलत पाेलिसांना चकमा देत हाेते. खबऱ्याने माहिती दिल्यानंतर लातूरचे विशेष पाेलिस पथक हरिद्वार (उत्तराखंड) शहरात धडकले आणि स्थानिक पाेलिसांच्या मदतीने डाॅ. प्रमाेद घुगेच्या एका आश्रमातून मुसक्या आवळल्या. त्याला बुधवारी लातूर न्यायालयाने सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
दुसऱ्या आराेपीच्या मागावर पाेलिस पथके...
बाळू डाेंगरे खून प्रकरणात दाेघांपैकी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिसांनी अटक केली आहे. दुसरा आराेपी अनिकेत मुंडे हा पाेलिस पथकांना गुन्हा घडल्यापासून गुंगारा देत फरार आहे. त्याच्या मागावर विविध पाेलिस पथके आहेत. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर
हरिद्वार ते लातूर ३६ तासांचा प्रवास...
डाॅ. घुगेला साेमवारी लातुरातील विशेष पाेलिस पथकाने अटक केल्यानंतर हरिद्वार येथील पाेलिसांकडून आराेपी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर रेल्वेने लातूरकडे हे पाेलिस पथक निघाले. साेमवार ते बुधवार असा तब्बल ३६ तासांचा प्रवास करत डाॅ. घुगेला पाेलिसांनी लातुरात आणले. बुधवारी त्याला लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंतची पाेलिस काेठडी सुनावली. - दिलीप सागर, पाेलिस निरीक्षक, शिवाजीनगर पाेलिस ठाणे, लातूर