रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:23+5:302021-07-07T04:25:23+5:30
एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू : प्रत्येक राज्यातील नियमावली वेगळी राजकुमार जोधळे / लातूर : रेल्वे विभागाच्या वतीने लातूर स्थानकासह मार्गावरून ...

रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का?
एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू : प्रत्येक राज्यातील नियमावली वेगळी
राजकुमार जोधळे / लातूर : रेल्वे विभागाच्या वतीने लातूर स्थानकासह मार्गावरून धावणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. पुणे-अमरावती, परळी वैजनाथ-मिरज, निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजर रेल्वे मात्र अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. परिणामी, लातूर, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो प्रवासी परराज्यात प्रवास करू लागले आहेत. कोरोना नियमांचे प्रवाशाकडून पालन होत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी आता परराज्यात प्रवास करायचे असेल तर कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. लातूरच्या रेल्वे स्थानकातून दरदिन सहा ते आठ रेल्वे धावत आहेत. या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या धावत असलेल्या रेल्वे या एक्स्प्रेस असल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येत आहे. त्यासाठी आता पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची गरज असल्याची भावना प्रवाशांची आहे.
पॅसेंजर रेल्वे कधी सुरू होणार?
लातूर स्थानकातून सध्याला एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. परिणामी, सामान्य प्रवाशांची हेळसांड होत आहे.
लातूरसह जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील प्रवाशांना पॅसेंजर रेल्वे नसल्याने, खासगी वाहनांचा प्रवासाला वापर करावा लागत आहे.
लातूर रेल्वेस्थानकातून धावणाऱ्या सर्व रेल्वे तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कोरोना तपासणी, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक...
लातूर रेल्वेस्थानकातून परराज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोना तपासणी किंवा लसीकरण झाल्याचे प्रमाणात गरजेचे आहे. अन्यथा त्या-त्या राज्यातील रेल्वेस्थानकात प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. कोरोना चाचणीचा अहवाल दाखविल्याशिवाय प्रवाशांना परराज्यातील शहरात प्रवेश नाही, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला सर्वाधिक प्रतिसाद...
लातूर-मुंबई आणि बीदर-मुंबई या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.
त्यापाठोपाठ कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-धनबाद या रेल्वेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू असल्याने सामान्य, खेड्यापाड्यातील प्रवाशांची हेळसांड होत आहे. अमरावती-पुणे, परळी वैजनाथ-मिरज आणि निजामाबाद-पंढरपूर या रेल्वे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
प्रवाशांचा प्रतिसाद...
लातूर रेल्वेस्थानकातून सध्याला एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू झालेल्या आहेत. याला प्रवाशातून प्रतिसाद मिळत आहे. येत्या आठवडाभरात हडपसर-हैदराबाद ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू होईल. तर पॅसेंजर गाड्याही लवकरच सुरू होतील.
- बीमलकुमार तिवारी, स्थानक प्रमुख, लातूर