कोणी लस देता का लस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST2021-05-05T04:31:41+5:302021-05-05T04:31:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मागणी तसा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रशासनाला अनेक केंद्रे बंद ...

कोणी लस देता का लस?
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मागणी तसा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रशासनाला अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. कोणी लस देता का लस, असे म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी पुरवठा झालेल्या दहा ते बारा हजार डोसेसवरच सध्या भागविले जात आहे.
हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचेही दोन्ही डोस पूर्ण झालेले नाहीत. ४५ ते ६० आणि ६० वर्षांपुढील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा पहिल्या डोसचा कालावधी संपलेला आहे. तरीही त्यांना दुसरा डोस मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना लस न घेता केंद्रावरून परतावे लागत आहे. २ मेपर्यंत १ लाख ९९ हजार ५७९ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. यातील ३४ हजार ६६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून ती संख्या २ लाख ३४ हजार २४२ आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या व्यक्तींनाही लस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु, लसीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरण यंत्रणा ठप्प झालेली आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे सुरू आहेत, तर ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी १७१ केंद्रे स्वतंत्र आहेत. स्थानिक आरोग्य प्रशासन नागरिकांना लस देण्यासाठी सज्ज आहे. परंतु, शासनस्तरावरून पुरवठा होत नसल्यामुळे यंत्रणा हतबल झालेली आहे. त्यांच्याकडे नागरिक, लस देता का? म्हणून येत आहेत. परंतु, त्यांना लस नसल्याचे लाभार्थ्यांना सांगावे लागत आहे. दरम्यान, १७१ केंद्रांपैकी सोमवारी आठ ते दहा केंद्रेच सुरू होती. लस नसल्यामुळे उर्वरित केंद्रे बंद होती.
६० वर्षांवरील
हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार ९७ हजार ९७३ ज्येष्ठांनी लस घेतली आहे.
४५ वर्षांवरील
४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देणे सुरू झाल्यानंतर ५७ हजार ५०३ लोकांनी लस घेतली. यातील अनेकांचा पहिला डोसचा कालावधी संपला आहे.
पहिला डोस घेऊन सहा आठवडे झाले आहेत. दुसऱ्या डोससाठी गेलो होतो. परंतु, लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. लस आल्यानंतर बोलविले जाईल. त्यानंतर तुम्ही दुसरा डोस घ्या. आणखी कालावधी आहे, असे सांगितले.
- लक्ष्मण श्रीमंगले
मी व माझ्या आईने लसीचा पहिला डोस घेतला आहे. सात आठवड्यांपेक्षा कालावधी अधिक झालेला आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याचे लसीकरण केंद्राकडून सांगण्यात आले. आता लस आल्यानंतरच दुसरा डोस घ्यावा लागेल. - मनोज तिवारी
१८ ते ४४ वयोगटात लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाईन नोंदणी करून मी शहरातील शासकीय लसीकरण केंद्रावर गेलो. मात्र, तेथे लस उपलब्ध नव्हती. पुढे रांगेत असलेल्या नागरिकांना ती दिली गेली. परत जावे लागले. - ऋषिकेश कमलापुरे