दरराेज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट; आरोग्य विभागाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:01+5:302021-04-21T04:20:01+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आपल्या फुप्फुसांची स्थिती योग्य आहे ...

दरराेज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट; आरोग्य विभागाचा सल्ला
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आपल्या फुप्फुसांची स्थिती योग्य आहे का, हे पाहण्यासाठी सोपी पद्धत अमलात आणली आहे. घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची ही चाचणी असून, ही वाॅक टेस्ट करण्याचा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दी, ताप, खोकला असा त्रास असलेल्या व्यक्तींना कोरोना तर झाला नाही ना, असा प्रश्न पडत आहे. अशावेळी फुप्फुसे योग्य स्थितीत आहेत का हे तपासण्यासाठी सहा मिनिटे वाॅक टेस्ट ही सोपी पद्धत आरोग्य विभागाने नागरिकांना सुचविली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने या चाचणीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर, प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
या टेस्टमुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल. जेणेकरून गरजू रुग्णाला वेळेवर दाखल करणे शक्य होईल. ताप, सर्दी, खोकला अथवा होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना ही चाचणी करता येईल. ज्यांना बसल्या जागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करू नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनी ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही टेस्ट करावी, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर करावी. ज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ-उतार नसावेत. पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही. घरातल्या कडक फरशीवर करणे कधीही चांगले. चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकाम्या जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी. घड्याळ, स्टाॅप वाॅच, पल्स ऑक्सिमीटर हे साहित्य त्यासाठी आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी करा चाचणी
चाचणी करण्यापूर्वी बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन पातळीची नोंद घ्यावी.
६ मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम. समजा १, २ टक्क्यांनी ऑक्सिजन कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा चाचणी करून काही बदल होतो का ते पाहावे.