रेणापुरातील पुरवठा विभागाच्या गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:40+5:302021-01-22T04:18:40+5:30
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी दुपारी येथील तहसील कार्यालयाअंतर्गतच्या अन्नधान्य साठ्यासाठीच्या गोदामाची अचानकपणे पाहणी केली. गोदामातील स्थिती, रेकॉर्डची ...

रेणापुरातील पुरवठा विभागाच्या गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी दुपारी येथील तहसील कार्यालयाअंतर्गतच्या अन्नधान्य साठ्यासाठीच्या गोदामाची अचानकपणे पाहणी केली. गोदामातील स्थिती, रेकॉर्डची तपासणी केली. गहू ,तांदूळ व अन्य धान्य रँडम पद्धतीने वजन करून पाहिले. त्याचबरोबर संपूर्ण गोदामाचा परिसर फिरून पाहून दुरुस्तीसाठी काही सूचना केल्या. त्यात मेन गेट नवीन बसविणे, कंपाऊंड वॉल, गोदामासाठीचा सिमेंट रस्ता, नादुरुस्त खिडक्या, आतील फरशी दुरुस्ती, आदींचा समावेश आहे. सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी तालुक्यातील इंदरठाणा गावाजवळील वाळूच्या घाटाला भेट देऊन पाहणी केली. तेथील गावकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी स्मशानभूमी व दर्ग्यास कंपाऊंड वॉल करून द्यावा, अशी मागणी केली. लवकरच ही मागणी पूर्ण करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडधुने, तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार आर. के. कराड, मंडळ अधिकारी दिलीप देवकते, तलाठी गोविंद शिंगडे, पुरवठा विभागाचे कारकून सूरज चिमूरकर, इंदरठाणा येथील मंडळ अधिकारी घोडके, तलाठी उपस्थित होते.