कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST2021-01-15T04:16:52+5:302021-01-15T04:16:52+5:30

दरम्यान, आरोग्य अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांसाठी लसीचे २० हजार ९८० डोसेस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

District administration ready for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

दरम्यान, आरोग्य अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांसाठी लसीचे २० हजार ९८० डोसेस प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, ग्रामीण रुग्णालय मुरुड, प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर लातूर या पाच ठिकाणी ड्राय रनची प्रात्यक्षिके करण्यात आली होती. कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात एकूण ४४५ लस टोचक व त्यांना मदत करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ८२४ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती कोविड पोर्टलवर अद्ययावत करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात ६८ शीत साठवण केंद्र...

जिल्ह्यात एकूण ६८ शीतसाठवण केंद्र आहेत. मात्र, परंतु लसीकरणासाठी १६ जानेवारी २०२१ रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उद्घाटन करण्यासाठी एकूण आठ लसीकरण केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, एम.आय.टी. वै. महाविद्यालय लातूर, विवेकानंद हॉस्पिटल लातूर, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय मुरुड आणि ग्रामीण रुग्णालय औसा या केंद्रांचा समावेश आहे.

१६ रोजी प्रत्यक्ष लसीकरण...

२० हजार ९८० डोसेस उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडून प्राप्त झाले असून, जिल्हा परिषदेच्या शीतसाखळी कक्षामध्ये दोन ते आठ डिग्री सेल्सिअस तापमानात साठविण्यात आलेली आहेत. गुरुवारी उपरोक्त केंद्रावर लस पुरवठा करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

Web Title: District administration ready for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.