संभाव्य प्रशासकीय मंडळाच्या नावांवरून कार्यकर्त्यांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:52+5:302021-07-12T04:13:52+5:30
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय कार्यकारी ...

संभाव्य प्रशासकीय मंडळाच्या नावांवरून कार्यकर्त्यांत नाराजी
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय कार्यकारी संचालक मंडळ नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. संभाव्य प्रशासकीय मंडळाच्या नावांवरून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीची जवळपास १० वर्षांपूर्वी निर्मिती झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी एकदाही निवडणूक झाली नाही. सुरुवातीस काँग्रेसचे प्रशासकीय संचालक मंडळ राहिले. त्यानंतर भाजपा प्रणित प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. या मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कार्यकारी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शासन नियुक्त संचालक मंडळाच्या नियुक्तीसाठी पालकमंत्र्यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आणि पणन मंत्र्यांनी पणन महामंडळाच्या प्रधान सचिवांकडे नावांची यादी शिफारस केली आहे. ही यादी कार्यकर्त्यांच्या हाती लागली असून यादीवरून तालुक्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, तालुक्यातील कार्यकर्ते उघड उघड नाराजी बोलून दाखवीत आहेत. काही कार्यकर्ते आपल्या भावना पक्षाच्या स्थानिक नेत्यांपुढे मांडत आहेत. काही प्रत्यक्ष तर काहींनी फोनवरून भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसमधील निष्ठावंतांना डावलले...
संभाव्य प्रस्तावित यादीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना या मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही. तसेच काँग्रेस पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मागासवर्गीय व महिलांनाही संधी देण्यात आली नाही. देवणीतील प्रमुख कार्यकर्ते आणि व्यापारी प्रतिनिधींनाही स्थान देण्यात आले नसल्याने शहर काँग्रेस व शहरवासीयांत नाराजी पसरली आहे.
एकंदर, या संभाव्य प्रस्तावित यादीवरून देवणी शहर व तालुक्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर त्याचा राजकीय परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.