दिलीप नागरगोजे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:28+5:302021-01-17T04:17:28+5:30
मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये जयंती साजरी लातूर : विशालनगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती ...

दिलीप नागरगोजे यांचा सत्कार
मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये जयंती साजरी
लातूर : विशालनगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, प्राचार्या सुमेरा शेख, अश्विनी केंद्रे यांची उपस्थिती होती. प्राचार्या सुमेरा शेख यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा अभियान
लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोमवारपासून पाच आगारात रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. लातुर विभागात औसा, निलंगा, उदगीर, लातुर आणि अहमदपूर अशी पाच आगार आहेत. तसेच जनजागृतीसाठी प्रत्येक आगारात बॅनर लावण्यात येणार असल्याचे लातुर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ग्रंथ देऊन करण्यात आला सत्कार
लातूर : पालकमंत्री अमित देशमुख यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, पृथ्वीराज शिरसाठ, हरीरराम कुलकर्णी, राजकुमार जाधव, ऍड. बाबासाहेब गायकवाड, राजकुमार पाटील, ऍड. दीपक सुळ, रविशंकर जाधव, सचिन बंडापल्ले आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर भर
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड अँटीजन चाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. दररोज दीड हजार व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. मनपाच्या वतीने विविध सेंटरवर रॅपिड अँटीजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
एसटी बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी
लातूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातुन शहर तसेच तालुकास्तरावर विद्यार्थी अपडाऊन करतात. मात्र, बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बसच्या फेऱ्या वाढविल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून होत आहे.
महापालिकेच्या वतीने कचऱ्याचे संकलन
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा संकलन करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत स्वतंत्र घंटागाडी नियुक्त करण्यात आली आहे. शहरातील गांधी चौक, बार्शी रोड, औसा रोड, रेणापूर नाका आदी रस्त्यावर नियमित कचरा संकलित केला जात आहे. तसेच रस्त्याची स्वछता मोहीम राबविली जात आहे.
पाच नंबर बसविले चौकात बॅरिकेट्स
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात अवजड वाहनाची रेलचेल असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. परिणामी, दुचाकी चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. यावर पर्याय म्हणून पाच नंबर चौकात बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.
तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात झाली वाढ
लातूर : जिल्ह्यात सोयाबीनसह तेलबियांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे चित्र आहे. गत खरीप हंगामात ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदाच्या रब्बी हंगामातही करडई, जवस, सूर्यफुल आदी तेलबियांच्या पेरणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या तेलबियाच्या फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.
मुबलक पाण्यामुळे बांधकामांना वेग
लातूर : यंदा चांगला पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लातुर शहरासह ग्रामीण भागात बांधकामांना वेग आला आहे. लॉकडाऊन काळात अनेक बांधकामे मजुराअभावी रखडली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, बांधकामांना वेग आला आहे. शहरात आबेक नागरिकांनी मनपाची परवानगी घेत बांधकामे सुरू केली आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत
लातुर : तालुक्यातील जेवळी, बसवंतपुरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. नादुरुस्त रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी जेवळी आणि बसवंतपुर येथील नागरिकांमधून होत आहे.
शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, दरात काही प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहेत. सध्या मिरची, लसूण, गवार, टोमॅटो, शेपू, मेथी, पालक, कोबी आदी भाज्यांची आवक होत आहे. तसेच फळबाजारात सफरचंद, केळी, चिकू, मोसंबी, संत्री आदी फळांची आवक होत आहे.
अतिवृष्टीच्या मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
लातूर : जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने पहिल्या टप्यातील अनुदान वितरित करण्यात आले. तर दुसऱ्या टप्यातील अनुदान जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अनुदान वाटप रखडले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीचे वाटप करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
बसस्थानक परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील मध्यवर्ती आणि रेणापूर नाका परिसरातील बसस्थानाक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहाची नियमित सफाई होत नसल्याची ओरड आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.