कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:18+5:302021-05-26T04:20:18+5:30
अहमदपूर : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घोळ झाला असून आरोग्य विभागाकडे १०२, तर महसूल प्रशासनाकडे २२३ जण कोरोनामुळे मृत्यू ...

कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत तफावत
अहमदपूर : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घोळ झाला असून आरोग्य विभागाकडे १०२, तर महसूल प्रशासनाकडे २२३ जण कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दोन्ही शासकीय यंत्रणेकडील नोंदीत तफावत झाल्याने तालुक्यात कोरोनामुळे निश्चित मृत्यू किती झाले, असा सवाल निर्माण होत आहे.
अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल २०२० मध्ये आढळला होता, तर मे महिन्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाच्या पोर्टलवर एकूण १०२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यातही काही उणिवा असल्याने तसेच काही ठिकाणी पोर्टल अपडेट केले नसल्याने आणि खासगी दवाखान्यांनी यासंबंधीची संख्या सरकारी यंत्रणेला अद्यापपर्यंत दिली नसल्याने पोर्टलवरील मृत्यूची संख्या कमी दिसत आहे. कारण, जिल्ह्यात एकूण १ हजार ९६८ मृत्यू झाले असून पोर्टलला १ हजार ५२८ अशी नोंद आहे, तर हस्तलिखित ४४२ मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे गाेंधळ उडत आहे.
महसूलच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे ऑडिट करण्याविषयी पत्र आले असून त्यानुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण याद्यांनुसार अहमदपूर तालुक्यात आतापर्यंत २२३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही संख्या राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यात त्या व्यक्तीचा व्यवसाय, त्याचे वार्षिक उत्पन्न व कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतो याविषयी पूर्ण माहिती आहे.
बाधिताच्या मृत्यूनंतरच पोर्टलवर नोंद...
एखाद्या बाधिताचा राज्यात कुठेही मृत्यू झाला, तर त्याची नोंद अहमदपूरच्या पोर्टलवर आपोआप होत असते. मात्र, या पोर्टलवर काही रुग्णालयांनी नोंदणी न केल्याने ते अपडेट झाले नाही. त्यामुळे तफावत येऊ शकते, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा सर्व्हे..
शासनाच्या निर्देशानुसार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. त्यात २२३ जणांची नाेंद झाली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हे...
प्रत्यक्ष सर्व्हे व पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार प्रत्यक्ष माहिती घेऊन प्रत्येक घरी भेट देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे या मृत्यूची संख्या देण्यात आली असल्याचे तलाठी माधव जोशी यांनी सांगितले.