डिझेल उपलब्ध, लालपरी सुसाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:10+5:302021-08-18T04:26:10+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात माेठ्या प्रमाणावर इंधन टंचाई निर्माण झाली हाेती. ...

डिझेल उपलब्ध, लालपरी सुसाट !
राजकुमार जाेंधळे / लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात माेठ्या प्रमाणावर इंधन टंचाई निर्माण झाली हाेती. परिणामी, जवळपास ५० टक्के बसेस आगारातच थांबून हाेत्या. आता लातूर विभागातील डिझेल तुटवड्याचा प्रश्न निकाली काढण्यात महामंडळ प्रशासनाला यश आले आहे. आता डिझेलअभावी जागेवर थांबलेल्या बसेस सुसाट धावत आहेत. यातून दरदिन लातूर विभागाला ३५ लाखांवर आर्थिक उत्पन्न मिळत आहे. लातूर विभागात लातूर, उदगीर हे सर्वात माेठे आगार आहेत. या आगाराचे दैनंदिन उत्पन्न सध्याला १० ते ११ लाखांच्या घरात आहे. काेराेनापूर्वी लातूर विभागाचे उत्पन्न हे ५० ते ६० लाखांच्या घरात हाेते. सध्याला ३५ लाखांवर आहे. यामध्ये अहमदपूर आगार ७ लाख, निलंगा ८ आणि औसा आगाराचे उत्पन्न ७ लाखांच्या घरात आहे. सध्याला १ लाख २५ हजार किलाेमीटर लालपरी धावत आहे. काेराेनापूर्वी ही लालपरी १ लाख ८० हजार किलाेमीटर धावत हाेती. सध्याला उत्पन्नात २० ते २५ लाखांची तूट आहे.
तीन आगारांचे उत्पन्न कमी...
लातूर विभागातील लातूर आणि उदगीर हे माेठे आगार उत्पन्नात आघाडीवर आहेत, तर उर्वरित अहमदपूर, औसा आणि निलंगा आगाराचे उत्पन्न कमी आहे. सध्याला या तीन आगारांचे उत्पन्न सात ते आठ लाखांच्या घरात आहे, तर लातूर आणि उदगीर आगाराचे दैनंदिन उत्पन्न १० ते १२ लाखांवर आहे.
३००
बसेस सुसाट...
लातूर विभागातील पाच आगारांत एकूण ४५० बसेसची संख्या आहे. त्यापैकी सध्याला ३०० बसेस वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. १५० बसेस प्रवाशांअभावी जागेवरच थांबून आहेत. लातूर विभागाला दरदिन २५ लाख रुपयांचे २७ ते २८ हजार लीटर डिझेल लागते. सध्याला लातूर विभागातील डिझेलचा प्रश्न निकाली काढण्यात महामंडळ प्रशासनाला यश आले आहे. परिणामी, प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
गत पंधरा दिवसांत लातूर विभागात डिझेलचा तुटवडा माेठ्या प्रमाणावर हाेता. परिणामी, अनेक बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. आता यातून मार्ग काढण्यात आला आहे. सध्याला डिझेल उपलब्ध झाले आहे. सर्वच मार्गांवरील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर