चाकूर तलाठी संघाचे तहसीलसमोर धरणे आंदोलन
By संदीप शिंदे | Updated: June 27, 2023 19:27 IST2023-06-27T19:26:17+5:302023-06-27T19:27:00+5:30
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या बदल्या करताना स्वग्राम हा मुद्दा उपस्थित करून समुपदेशनाचा केवळ सोपस्कार पूर्ण केला जात आहे

चाकूर तलाठी संघाचे तहसीलसमोर धरणे आंदोलन
चाकूर : नवीन महसूल मंडळावर पात्र तलाठी यांच्या पदोन्नतीसाठी पाठपुरावा करुनही कोणताही निर्णय झालेला नाही. मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांनी पदोन्नती दिली असून, लातूर जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणाताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या बदल्या करताना स्वग्राम हा मुद्दा उपस्थित करून समुपदेशनाचा केवळ सोपस्कार पूर्ण केला जात आहे. कर्मचारी यांनी दिलेल्या पर्यायाव्यतिरिक्त जाणीवपूर्वक दुसऱ्याच तालुक्यात बदली केली जात आहे. सर्वांना समान न्याय हे तत्व अवलंबिले जात नसून, काही कर्मचाऱ्यांच्या सोयीने बदल्या केल्या जात आहेत. वर्ग ३ चे कर्मचारी यांच्यासाठी शासनाने स्वग्रामचा मुद्दा कुठेही उपस्थित केलेला नसताना जिल्हाधिकारी मात्र त्याचा आधार घेत बदलीचे धोरण राबवत आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार, जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत तेरकर, सचिव कमलाकर अरडले, मंडळ अधिकारी अभिजित बेलगावकर, नीलकंठ केंद्रे, तलाठी दत्तात्रय तेली, माधव पाटील, संतोष स्वामी, मौला शेख, बालाजी हाक्के, परमेश्वर माने, सागर फुलसुरे, संजय जोशी, दत्ता कोळी, बसवेश्वर मजगे, मुक्ता भूरकापल्ले, सुषमा सूर्यवंशी, रोहिणी गायकवाड, सोनटक्के आदी उपस्थित होते.