९,१० आणि ११ फेब्रुवारीला लातूरमध्ये पार पडणार धनगर साहित्य संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:26 IST2018-01-31T12:25:57+5:302018-01-31T12:26:08+5:30
समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे

९,१० आणि ११ फेब्रुवारीला लातूरमध्ये पार पडणार धनगर साहित्य संमेलन
ठाणे - महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धगनर समाज असून, समाजाला इतिहास, कला, नृत्य, ओव्या, साहित्य, संस्कृती अशी संपन्न आणि समृद्ध परंपरा आहे. मात्र, राज्यभरात विखुरलेल्या या समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळात एकही साहित्य संमेलन झालेले नाही. त्यामुळे समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांनी दिली
लातूर येथे होत असलेल्या धनगर साहित्य संमेलनाची माहिती ठाण्यातील धनगर समाजातील नागरिकांना व्हावी यासाठी ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे,धनगर समाजचे नेते बाबासाहेब दगडे,वकील नानासाहेब मोटे,समाजाचे जेष्ठ नेते अभिमन्यू शेंडगे,डॉ अरुण गावडे,धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक कुरकुंडे,माणगंगा प्रतिष्ठान अध्यक्ष बाबासहेब माने,वकील प्रकाश पुजारी, धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, श्री पाटील साहेब आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
धनगर साहित्य परिषद आयोजित दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन लातूर येथे होत आहे. ९,१० व ११ फेब्रुवारी २०१८ असे तीन दिवस वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद, पहिल्या दिवशी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी दिंडी, ओव्या, ढोल-ताशे याचे प्रदर्शन होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी या संमेलनाचे पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून ११ रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यीक कांचा इलाही यांच्या हस्ते समारोप होणार आहे. या तीन दिवसात वेगवेगळ्या प्रश्नांवर परिसंवाद, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तरी या संमेलनाला सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे अशी विनंती नगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांनी केली आहे
संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीता धायगुडे
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगीता उत्तम धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता धायगुडे या सध्या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आंधळी, ता. माण, जि. सातारा येथे झाले आहे. समाजशास्त्र विषयात एसएनडीटी महाविद्यालयातून पदवी व एम.ए. मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे ‘हुमाना’ हे आत्मकथन सध्या जगभरात गाजत आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रिय आयुष्यास सप्रेम नमस्कार’ हा कवितासंग्रह प्रचंड गाजला आहे. असे अनेक उल्लेखनीय कार्य संगीता धायगुडे यांचे आहे.