निलंबन झाले तरी ओबीसी, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:11+5:302021-07-09T04:14:11+5:30

औसा : ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दल आम्ही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. निलंबन झाल्याचे ...

Despite the suspension, OBC will agitate for Maratha reservation | निलंबन झाले तरी ओबीसी, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार

निलंबन झाले तरी ओबीसी, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार

औसा : ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दल आम्ही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. निलंबन झाल्याचे दु:ख नाही. परंतु, माझ्या मार्गाने होत असलेला औशाचा विकास दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, औसेकरांची एवढी ताकद माझ्या पाठीशी असल्यास असे कितीही वेळा निलंबन झाले तरी आगामी काळात ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दल तीव्र आंदोलन करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

आमदार अभिमन्यू पवार यांचे उजनी, आशीव, तावशीताड, बेेलकुंड, बोरफळ व औशात भाजप ओबीसी मोर्चा व ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आले. औशातील संपर्क कार्यालयासमोर आमदार पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार पवार म्हणाले, खरेतर निलंबन करायचे असेल तर सर्वच पक्षातील मिळून ३० ते ४० आमदारांचे व्हायला पाहिजे होते. मात्र, जाणीवपूर्वक भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनामुळे काहीही फरक पडणार नाही. केवळ विधानसभेच्या आवारात जात येत नाही. उर्वरित कुठलाही फंड, निधी अथवा विकासकामांवर परिणाम होणार नाही.

ओबीसींचे आता राजकीय आरक्षण गेले आहे. पुन्हा शैक्षणिकही जाईल. त्यामुळे याविरोधात एकवटून समोर आले पाहिजे. विधीमंडळ अधिवेशनात औसा मतदार संघातील पीक विमा, रोहित्र, शेतरस्ते अशा अनेक प्रश्नांची प्रश्नावली होती. एकूण ६२ प्रश्न टाकले होते. ओबीसी व मराठा समाजाच्या सन्मानासाठी भाजप मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.

यावेळी ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, संतोषअप्पा मुक्ता, भाजपचे गटनेते सुनील उटगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमाशंकर राचट्टे, भीमाशंकर मिटकरी, सुशीलदादा बाजपाई, ज्ञानेश्वर वाकडे, गोपाळ धानुरे, फहिम शेख, विकास नरहरे, राम कांबळे, विनोद नंजीले, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष गंगाधर इसापुरे, हणमंत सूर्यवंशी, जगदीश परदेशी, पवन राचट्टे, विकास कटके, महादेव कटके, जगदीश चव्हाण, आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Despite the suspension, OBC will agitate for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.