अवैध राखेची वाहतूक थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:47+5:302021-04-19T04:17:47+5:30
परळीहून पानगाव परिसरात मोठ्या प्रमाणात राख, रेतीची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वाहतूक केली जात आहे. ...

अवैध राखेची वाहतूक थांबविण्याची मागणी
परळीहून पानगाव परिसरात मोठ्या प्रमाणात राख, रेतीची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक रेती, राख भरण्यात येत आहे. त्यामुळे ती रस्त्यार पडत आहे. या वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. पानगाव येथील मुख्य रस्त्यालगत बाजारपेठ व विविध ठिकाणी वस्त्या आहेत. राख, रेती रस्त्यावर पडल्याने दुकानदारांसह वस्तीतील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच आणखीन हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
पानगावहून होणारी अवैध राखेची वाहतूक बंद करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष इम्रान मनियार, शहराध्यक्ष चेतन चौहान, सूर्यकांत गालफडे, बालाजी हनवते, लतिफ शेख, बाबा पठाण, अविनाश वाघमारे, बालाजी माने, असिफ शेख, गौस शेख, विशाल भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.