दैठणा येथे ज्येष्ठांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:44+5:302021-06-02T04:16:44+5:30
दैठणा आणि शेंद ही दोन्ही गावे तालुक्यातील शेवटची गावे असून, दोन्ही गावात दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

दैठणा येथे ज्येष्ठांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
दैठणा आणि शेंद ही दोन्ही गावे तालुक्यातील शेवटची गावे असून, दोन्ही गावात दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर आगाराची एकमेव सुरू असलेली एसटी दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु संचारबंदीमुळे खाजगी वाहने सुरू नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना साकोळला लस घेण्यासाठी जाणे कठीण झाले आहे. त्यातच साकोळला जाण्यासाठी दोन ठिकाणी वाहने बदलावी लागतात. परिणामी दैठणा, शेंद येथील अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे दैठणा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी दैठणा आणि शेंद येथील ग्रामस्थांनी केली आहे.
उपकेंद्रसुध्दा दहा किमी अंतरावर...
दैठणा गावाचा समावेश साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डिगोळ उपकेंद्रात करण्यात आला असला तरी डिगोळ उपकेंद्र १० किमी अंतरावर आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रास जाण्यासाठी दोन ठिकाणी तर उपकेंद्रात जाण्यासाठी तीन ठिकाणी वाहने बदलावी लागतात. म्हणून भौगोलिकदृष्ट्या आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र दोन्ही गैरसोयीचे आहेत.
लसीकरणासाठी शाळेची इमारत...
लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी शाळेची भव्य इमारत आहे. सध्या शाळा आहे बंद असल्याने जिल्हा परिषद शाळेच्या दहा खोल्याची इमारत रिकामीच आहे. आठवड्यातील एक दिवस लसीकरण झाले तर लसीकरणाचा वेग वाढणार आहे. शिवाय दोन गावच्या नागरिकांची सोय होणार आहे.