हंगामी वसतिगृह सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:32+5:302021-01-17T04:17:32+5:30
ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होऊ नये आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हंगामी ...

हंगामी वसतिगृह सुरू करण्याची मागणी
ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होऊ नये आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हंगामी अनिवासी वसतिगृह योजना शासनाच्या वतीने राबविली जाते; परंतु तालुक्यासह जिल्ह्यात एकही हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू झाले नाही. तालुक्यातील अनेक वाड्या, वस्ती, तांड्यावरील मजूर दसरा, दिवाळीमध्ये ऊसतोडणीसाठी राज्यातील विविध भागांत जातात. ऊसतोडणीची उचल घेऊन ती फेडण्यासाठी सहा ते सात महिने आपल्या गावापासून दूर उसाच्या फडात राहतात. हे मजूर जाताना आपल्यासोबत मुलांना घेऊन जातात. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो.
स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्ह्याला प्राप्त झाले असतानाही जवळपास साडेतीन महिने उलटले तरी अद्याप एकही हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू झालेले नाही. त्यामुळे हे वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बालहक्क अभियानच्या वतीने तालुकाप्रमुख, पानगाव ग्राम बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर गालफाडे यांनी केली आहे.