गावची तहान भागविण्यासाठी विंधन विहिरीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:24+5:302021-06-05T04:15:24+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद उत्तर येथील सरपंचाने गावची तहान भागविण्यासाठी स्वतःच्या विंधन विहिरीचे लोकार्पण केले. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या ...

Dedication of bore well to quench the thirst of the village | गावची तहान भागविण्यासाठी विंधन विहिरीचे लोकार्पण

गावची तहान भागविण्यासाठी विंधन विहिरीचे लोकार्पण

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद उत्तर येथील सरपंचाने गावची तहान भागविण्यासाठी स्वतःच्या विंधन विहिरीचे लोकार्पण केले. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली. शेतीचा पाणी पुरवठा कमी करून ग्रामस्थांची अडचण दूर केली आहे.

साकोळ मध्यम प्रकल्पामुळे तालुक्यातील शेंद उत्तर गावचे पुनर्वसन झाले. या गावची धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. मध्यम प्रकल्पावरून गावच्या पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, या योजनेच्या पाण्याचा केवळ सांडपाण्यासाठी वापर केला जातो. उन्हाळ्यात गावातील हातपंप बंद पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण येत होती. त्यामुळे सरपंच वैशाली परबत माने यांनी स्वतः च्या शेतीचे पाणी कमी करून गावची तहान भागविण्याचा निर्णय घेतला.

गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विंधन विहिरीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर करून घेता आले असता. परंतु शासनाच्या कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता केवळ नागरिकांच्या जिव्हाळ्यापोटी स्वत:च्या विंधन विहिरीचे लोकार्पण करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे.

सरपंचाचा सत्कार...

शेंदच्या सरपंच वैशाली परबत माने यांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तालुक्यातील इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून राष्ट्रवादीच्या तालुका शाखेच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या सूचनेवरून सरपंच दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, ओबीसी सेलचे कार्यध्यक्ष गोविंद शेळगे, ज्येष्ठ नागरिक दगडू सुरवसे, अभियंता अविनाश माने, राजू शेख, सोमनाथ सिंदाळकर, धोंडिराम चिंतनगिरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dedication of bore well to quench the thirst of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.