अहमदपूरच्या पाणीपुरवठ्याला पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:39+5:302021-07-12T04:13:39+5:30
अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमागील शुक्लकाष्ठ अजून सुरूच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गुत्तेदाराच्या वादात पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची ...

अहमदपूरच्या पाणीपुरवठ्याला पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत
अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमागील शुक्लकाष्ठ अजून सुरूच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गुत्तेदाराच्या वादात पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. दंड आकारुनही गुत्तेदार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी बैठकीत सर्वांनाच खडसावून पाणी उपलब्ध न केल्यास कारवाई करण्याची सूचना केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अहमदपूर पाणीपुरवठ्याची मासिक बैठक घेतली जाते. बैठकीत सांगितलेल्या सूचनांचे गुत्तेदार व जीवन प्राधिकरणचे अभियंता पालन करत नाहीत. ठरवून दिल्याप्रमाणे काम होत नाहीत. त्यामुळे वारंवार लेखी, तोंडी सूचना करून, तसेच दंड आकारुनही परिणाम झाला नाही. जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी पालिकेत आढावा बैठक घेतली. तेव्हा मागील बैठकीतील मुद्दे समोर आल्याने प्रशासन अधिकारी संतापले. त्यांनी अहमदपूरकरांना ३१ ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्ध करून न दिल्यास सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगितले. तेव्हा फिल्टर, मेकॅनिकल कामासाठी दोन महिने वेळ लागणार असल्याचे गुत्तेदाराने सांगितले, तसेच जलवाहिनी जोडणे, शहरातील जलवाहिनीची टेस्टिंग करणे ही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे अहमदपूरकरांना आणखी दोन महिने मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही.
पालिका, जीवन प्राधिकरण व गुत्तेदाराच्या समन्वयाअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बैठकीस जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. व्ही. कायंदे, उपअभियंता विकास बडे, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, सय्यद मुसा यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
आणखी दोन महिने लागणार...
बैठकीत विविध कामाचा आढावा घेण्यात येऊन चर्चा झाली. त्यात फिल्टरच्या कामासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यामुळे दोन महिन्यांनंतर सुरळीत व मुबलक पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.
शहरात २० टक्के जलवाहिनीचे काम अपूर्ण...
निविदेप्रमाणे १०० कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. मात्र, शहरातील २० टक्के भागात अद्याप वितरण प्रणालीसाठी जलवाहिनीचे काम झाले नाही. त्यामुळे जादा १० कि.मी.ची जलवाहिनी होणार आहे. त्यासाठी ५० ते ६० लाख रुपये जादा लागणार आहेत. पालिकेला हा भुर्दंड बसणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चुकीची निविदा केली असल्याचा आरोप नगरसेवक संदीप चौधरी यांनी केला.