वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:16+5:302021-05-09T04:20:16+5:30
शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा जळकोट तालुक्यास बसला. यात लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान
शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा जळकोट तालुक्यास बसला. यात लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शहरासह मरसांगवी, शिवाजीनगर तांडा, रावणकोळा, भवानीनगर तांडा, सुल्लाळी, डोंगरगाव, हळद वाढवणा, पाटोदा खु., वांजरवाडा, धामणगाव, केकत शिंदगी या गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसून नुकसान झाले आहे. केशर आंब्याच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.
शिवाजीनगर तांडा, हतनूर, गव्हाण, पाटोदा बु., जळकोट येथील केशर आंब्यास सर्वाधिक फटका बसला आहे. गावरान आंब्याच्या कैऱ्या गळाल्या आहेत. उन्हाळी भुईमूग आणि हळदीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. तत्काळ पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, विकास सोमवंशी, मुक्तेश्वर येवले, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, सरपंच तानाजी राठोड, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, प्रशांत देवशेट्टे, साहेबराव पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, गोविंद केंद्रे, आदींनी केली आहे.
पंचनामे करण्याचे आदेश...
प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येईल, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक गावात तलाठ्यास पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येतील.
वीज कोसळून जनावरे दगावली...
हतनूर येथील कोंडिबा जाधव यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैल जागीच दगावला. बोरसांगवी येथील रामदास दत्ता कोरे यांच्या म्हैशीवर वीज कोसळल्याने ती दगावली. पाटोदा खु. येथे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.