दैठण्याच्या मुख्य रस्त्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:24+5:302021-06-28T04:15:24+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निधी मंजूर करण्यात ...

दैठण्याच्या मुख्य रस्त्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकले !
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला. लवकर काम पूर्ण करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, काही दिवस उलटले तरी निविदा उघडून त्यास मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे दैठण्याच्या मुख्य रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेत अडकले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.
दैठणा- शिरूर अनंतपाळ या प्रमुख जिल्हा मार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून हिप्पळगाव-शेकापूर-उदगीर या १६ कि.मी. अंतरावरील दुरवस्था झालेल्या ठिकाणचे मजबुतीकरण, डांबरीकरण, तसेच साइड पट्ट्यांच्या कामासाठी दोनदा निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु प्रत्यक्षात निधी इतरत्र वळविण्यात आला. त्यानंतर निधीची तरतूद झाली नाही. परिणामी जवळपास दोन वर्षांपासून दैठण्याच्या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. दरम्यान, येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने रस्त्याच्या कामाचे पुन्हा नव्याने अंदाजपत्रक तयार करून निधीची तरतूद व्हावी म्हणून मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार निधीची तरतूद झाली. काम सुरू करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. अधिकृत ठेकेदाराकडून निविदा भरण्यात आल्या आहेत; परंतु निविदा उघडून योग्य निविदेस मंजुरी देण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दैठण्याच्या मुख्य रस्त्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकले असल्याने ग्रामस्थांना उन्हाळ्यात धुळीचा, तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांचेही मोठे हाल होत आहेत.
१८०० मीटर डांबरीकरण मंजूर...
दैठणा रस्त्याचे पूर्ण काम व्हावे म्हणून जवळपास १८०० मीटर डांबरीकरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १२० मीटर सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. पावसाळ्यात कमीत-कमी सिमेंट रस्ता तरी पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
आठवडाभरात निविदा प्रक्रिया...
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील म्हणाले, एका आठवड्यात निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण होईल आणि पावसाळ्यात सिमेंट रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.