इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:19+5:302021-07-13T04:06:19+5:30
उदगीर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच खाद्यतेलासह ...

इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
उदगीर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सर्वसामान्यांना फटका बसत असल्याने काँग्रेसतर्फे सोमवारी सायकल रॅली काढण्यात येऊन संताप व्यक्त करण्यात आला.
शहरातील देगलूर रोड येथील कॅप्टन कृष्णकांत चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत सोमवारी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमुळे दीड वर्षांपासून सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब, ज्यांचे हातावर पोट आहे, अशांचा रोजगार गेला आहे. व्यापार व उद्योगधंदे ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढत आहे.छोट्या व्यापाऱ्यांचेही जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आले. मात्र, आज देशातील प्रत्येक घटकातील माणसांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून महागाई कमी करावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, विजयकुमार चवळे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. शिवाजीराव देवनाळे, अमोल कांडगीरे, अहमद सरवर, अभय देशमुख, अमोल घुमाडे, श्रीनिवास एकुर्केकर, अनिल मुदाळे, शेख महेबूब, माधव कांबळे, शशिकांत बनसोडे, नंदकुमार पटणे, लक्ष्मण सोनवळे, धनाजी मुळे, रतिकांत पाटील, आदर्श पिंपरे, सद्दाम बागवान, महेंद्र पाटील, कुणाल बागबंदे, ईश्वर समगे, संतोष वळसणे, कमलाकर गायकवाड, ज्ञानेश्वर भांगे, प्रभाकर पाटील, ज्ञानोबा गोडभरले, आदींच्या सह्या आहेत.