उदगीर शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:42+5:302021-06-02T04:16:42+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उदगीर शहर व परिसरात बाधित रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून वाढत होती. एप्रिल महिन्यात तर तालुक्यात शहरासह ...

Crowds of citizens shopping in Udgir city markets! | उदगीर शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !

उदगीर शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उदगीर शहर व परिसरात बाधित रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून वाढत होती. एप्रिल महिन्यात तर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा खरेदी करण्यासाठी शहरात एकच गर्दी केली होती. पत्तीवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुक्कावार चौक, चौबारा परिसर, किराणा मार्केट, मार्केट यार्ड, भाजी मार्केट आदीसह अनेक भागात नागरिकांनी किराणा, तेल, भाजीपाला, खाद्यपदार्थ, धान्य, कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. कपड्यांच्या अनेक दुकानांत पाय ठेवायलाही जागा नव्हती. या गर्दीत कोरोनाचा कुठलाही नियम नागरिक पाळत नसल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागल्यामुळे बी-बियाणे व खते, औषधींच्या दुकानात बियाणे खरेदीसाठी व घरावरील पत्रे खरेदीसाठी सुद्धा हार्डवेअरच्या दुकानात गर्दी दिसून आली. सोने खरेदी-विक्रीच्या दुकानात सुद्धा ग्राहक दिसून येत होते. उदगीर शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वाहने व शहरातील रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मार्केट यार्डकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन आलेली वाहने अडकून पडली असल्याचे चित्र होते.

वाहतुकीची काेंडी; वाहनधारक त्रस्त...

मंगळवारी सकाळपासून शहरातील बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. परिणामी, मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहतुकीची कोंडी दूर केली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. दरम्यान, संचारबंदीत शिथिलता देण्यात आली असली तरी, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Crowds of citizens shopping in Udgir city markets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.