रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोविड चाचणी, बाधितास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:56+5:302021-04-19T04:17:56+5:30
जिल्ह्यातील काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी तसेच वीकेंड लॉकडाऊन केले आहे. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा ...

रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोविड चाचणी, बाधितास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल
जिल्ह्यातील काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी तसेच वीकेंड लॉकडाऊन केले आहे. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक हिमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरात उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस अंमलदार व आरोग्य विभाग यांच्यामार्फत नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना थांबवून त्यांची अँटिजेन चाचणी केली जात आहे. त्यात जे पॉझिटिव्ह येतील, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येतो आहे, त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.
शनिवारी शहरात संयुक्त पथकाने एकूण १४८ जणांची तपासणी केली. त्यामध्ये १० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
नियमांचे पालन करावे...
ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.