CoronaVirus : आणखी ७ पॉझिटिव्हने उदगीरला पुन्हा धक्का; ४ अहवाल प्रलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:17 IST2020-05-06T23:16:37+5:302020-05-06T23:17:04+5:30
लातूर शहरातुन तपासण्यात आलेले सर्व ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

CoronaVirus : आणखी ७ पॉझिटिव्हने उदगीरला पुन्हा धक्का; ४ अहवाल प्रलंबीत
लातूर : उदगीर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील ३९ जणांचे स्वॅब बुधवारी तपासण्यात आले. त्यातील ७ पॉझिटिव्ह तर २८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, लातूर शहरातुन तपासण्यात आलेले सर्व ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आजपर्यंत उदगीरचे २५१ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र यापूर्वीच्या बाधितांच्या कुटुंबातील, निकटच्या संपर्कातील १४ जण बाधित निघाले, त्यात बुधवारी ७ जणांची भर पडली. एकूण २१ वर उपचार सुरू आहेत, एक मृत्यू असा उदगीरचा आलेख २२ वर जातो. लागण शहराच्या अन्य भागात पसरणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणा, प्रशासन घेत आहे.
विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर म्हणाले, ६ मे रोजी एकूण ६२ स्वॅब तपासणीला आले होते. त्यात ३९ उदगीरचे, ७ लातूरचे तर १६ बीडचे होते.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार थर्मल स्कॅनिंग तसेच खोकला, सर्दी व श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर तपासणी केली जात आहे. त्यानुसार प्रमाणपत्रही देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्र सर्व शासकीय रुग्णालये अथवा जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी डॉक्टरांकडून घ्यावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत ५३६ स्वॅब घेण्यात आले. त्यातील ५२५ स्वॅब हे निगेटिव्ह आलेले आहेत. उदगीरमधील सर्व बाधित रुग्ण ज्या भागातील आहेत तेथील परिसर सिलबंद आहे. सध्या परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनाही होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.