CoronaVirus : उदगीरमध्ये आणखी ५ पॉझिटिव्ह; लातूर येथील ४ अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:00 IST2020-05-10T20:00:28+5:302020-05-10T20:00:54+5:30
लातुरातील ४ तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ३ अहवाल निगेटिव्ह

CoronaVirus : उदगीरमध्ये आणखी ५ पॉझिटिव्ह; लातूर येथील ४ अहवाल निगेटिव्ह
लातूर : उदगीर शहरातील ३३ जणांच्या स्वॅबची रविवारी तपासणी झाली. त्यामध्ये ५ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २८ निगेटिव्ह आहेत. त्यामध्ये उपचार करणाऱ्या ३ डॉक्टरांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, लातूर येथून घेण्यात आलेले चार अहवालही निगेटिव्ह आले असून, उदगीरमध्ये मयत महिलेसह कोरोनाबाधितांची संख्या २८ वर पोहोचली आहे.
उदगीर शहरातील पाच कुटुंबातील व त्यांच्या संपर्कातील २२ जणांवर उदगीरच्याच सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात पाच जणांची भर पडली आहे. तर प्रारंभी एका वयोवृद्ध आजारी बाधित महिलेचा मृत्यू झाला होता. आजपर्यंत लातूर जिल्ह्यात एकूण ६०२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर मयत महिलेनंतर २७ बाधितांवर उपचार सुरू असून, ८ कोरोनामुक्त झाले आहेत. लातूर महापालिका हद्दीत एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
उदगीरमध्ये आजपर्यंत आढळलेले सर्व रुग्ण ५ कुटुंब व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी आहेत. तसेच प्रशासनाने जाहीर केलेल्या बाधित क्षेत्रामधीलच सदरील रुग्ण असून, शहराच्या अन्य भागांत लागण पसरलेली नाही. दरम्यान, रविवारी आढळलेले ५ रुग्ण आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत, याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले.