कोरोनाच्या संसर्गामुळे बंदोबस्त वाढला, पोलिसांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:08+5:302021-05-01T04:18:08+5:30
रेणापूर तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाख आहे; मात्र त्या तुलनेत रेणापूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी संख्या नाही. येथील ठाण्यात ...

कोरोनाच्या संसर्गामुळे बंदोबस्त वाढला, पोलिसांवर ताण
रेणापूर तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाख आहे; मात्र त्या तुलनेत रेणापूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी संख्या नाही. येथील ठाण्यात एकूण ४५ कर्मचारी आहेत. त्यात दोन कर्मचारी हे चाकुरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि गातेगाव येथे कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या ४३ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी हे कायमच्या कामावर कार्यरत आहेत. त्यात बर्दापूर नाकाबंदीसाठी ३, रेणापूर नाकाबंदीसाठी १, पेट्रोलिंग १, पोलीस गाडीवरील चालक ४, चार पोलीस कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्याचबरोबर चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एक अधिकारी पॉझिटिव्ह आहे. एक अधिकारी पाटबंधारे विभागाकडे बंदोबस्तासाठी, एक अधिकारी पेट्रोलिंगसाठी असे ३ अधिकारी आहेत.
२१ कर्मचाऱ्यांवर तालुक्यातील ७१ गावांचा भार आहे. रेणापूर पोलीस ठाण्याच्या पानगाव दूरक्षेत्राबरोबर स्टेशन डायरी, वायरलेस यासह अन्य कारभार पाहावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांना संचारबंदीची कडक अंमलबजावणी, वेगवेगळ्या घटना, अपघात, गंभीर गुन्ह्यांची चौकशी, येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदोबस्तासह विविध कामे करावी लागत आहेत. हे कर्मचारी सतत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिक, विविध संस्था, स्वयंसेवकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तसेच नगरपंचायतीने वेगवेगळ्या कमिटी, ॲन्टी कोरोना फोर्स निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यासह रेणापूर तालुक्यात कोरोना संसर्ग सुरू आहे. तेव्हापासून रेणापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी हे सतत कार्यरत आहेत. यातील काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ते पुन्हा कामावर रुजू होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज...
कोरोनाच्या संकटामुळे बंदोबस्तासह अन्य कामे पोलिसांना करावी लागत आहेत. सध्या येथील ठाण्यात कमी कर्मचारी आहेत. सततच्या कामामुळे ताण येत आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे रेणापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांनी सांगितले.