कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:09+5:302021-06-28T04:15:09+5:30
लातूर : लॉकडाऊन काळात अनेकांना घरीच राहावे लागले. त्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांची झोप ...

कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप !
लातूर : लॉकडाऊन काळात अनेकांना घरीच राहावे लागले. त्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांची झोप उडाली असून, निद्रानाशेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण झोप येत नसल्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले; परंतु परत रुग्णसंख्या वाढू लागल्याने निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम तर काही जणांना घरीच राहावे लागले. अनेकांचे व्यवसाय, उद्योग बंद असल्याने दिवसभर घरीच राहत विरंगुळा व्हावा, यासाठी अनेकांनी मोबाइलचा वापर वाढविला, तर लहान मुलांचा अभ्यासक्रमही ऑनलाइन झाल्यामुळे मुलांमध्ये मोबाइल वापराचे प्रमाण वाढले. रात्री उशिरापर्यंत मोबाइल हाताळल्यामुळे पुरेशी झोप येत नाही. यातून लहान मुलांसोबतच तरुण वर्गालाही निद्रानाशेची समस्या जाणवू लागली आहे. अपुऱ्या झोपेमुळे मधुमेह, थॉयराॅइड, मानसिक आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम...
पुरेशी झोप न झाल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते.
झोप नसल्याने चिडचिडेपणा वाढतो.
लहान मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होतो.
मधुमेह, मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
गेल्या काही दिवसांपासून अनेकांचा मोबाइलचा वापर वाढला आहे. घरी विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर केला जातो. बाहेर निर्बंध असल्याने अनेकजण बाहेर जाणे टाळतात. त्यामुळे मोबाइलचा वापर कमी करणे गरजेचे आहे.
झोप का उडते
१. मेलॅनिन संप्रेरक कमी झाल्याने निद्रानाशेची समस्या उद्भवत असते. डोमामाइन रसायन कमी झाल्याने झोप लागत नाही.
२. रात्री झोपण्यापूर्वी तेलकट व पचनास जड अन्नाचे सेवन केल्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही.
३. बेडरूमचा वापर केवळ झोपण्यासाठी करणे गरजेचे असते. मात्र, अनेकजण बेडरूममध्ये जेवण करतात. त्यामुळे झोपेसाठी पोषक वातावरण राहत नाही.
४. झोपण्यापूर्वी मोबाइलचा अतिवापर केल्याने डोळ्यांवर प्रकाश पडल्याने मेंदूला ॲक्टिव्ह केले जाते. त्यामुळे झोप उडते.
नेमकी किती झोप हवी?
नवजात बाळ १६ ते १८ तास
१ ते ५ वर्षे १० ते १२ तास
शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास
२१ ते ४० वयोगट ७ ते ९ तास
४१ ते ६० वयोगट ७ ते ९ तास
६१ पेक्षा जास्त ७ ते ९ तास
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
अनेकजण झोप येत नसल्यामुळे स्वत:हून झोपेच्या गोळ्या घेत असतात. काही कालावधीनंतर अशा गोळ्या घेण्याची शरीराला सवय लागून जाते. गोळ्यांचा अतिरेक झाल्याने छातीत धडधडणे, श्वास मंदावणे, कामात मन न लागणे, थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत ऐकावे
रात्री जड अन्न खाणे टाळावे
झोपण्याअगोदर दोन तास मोबाइल दूर ठेवावा
सकाळी योगा आणि व्यायाम करावा.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, योगा आणि संतुलित आहार गरजेचा आहे. त्याच तुलनेत झोपही आवश्यक आहे. झोप झाली तरच शारीरिक आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.