जिल्ह्यात १७७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:25+5:302021-05-27T04:21:25+5:30
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तर दुसऱ्या ...

जिल्ह्यात १७७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तर दुसऱ्या लाटेत प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढीस लागले आहे. परिणामी, अनेक बालकांनी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला गमावले आहे. पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण आणि संगोपन व्हावे, यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत १७७ बालके सापडली आहेत. यामध्ये एका मुलाने आई आणि वडील या दोघांनाही गमावलेले आहे. या बालकांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शासनाच्या वतीने ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक आणि इतर बाबीसाठी मदत केली जाणार आहे.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...
कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहूना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालविकास विभागाच्या बाल संगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे. या योजनेतून ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत बालकांना मदत दिली जाणार असून, त्यासाठी शाळेत नियमित उपस्थिती असणे बंधनकारक राहणार आहे.
कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या
मुले - १००
मुली - ७७
या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...
सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगावी घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलाची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाही अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.
कोट...
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत १७७ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा मानस आहे. या सर्व बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.- वर्षा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, लातूर.