ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला, गृहविलगीकरणातील बाधितांकडे दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:04+5:302021-04-16T04:19:04+5:30
फेब्रुवारीअखेरीसपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून कॉन्टक्ट ट्रेसिंगवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात ...

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला, गृहविलगीकरणातील बाधितांकडे दुर्लक्ष !
फेब्रुवारीअखेरीसपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून कॉन्टक्ट ट्रेसिंगवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बुधवारपर्यंत बाधितांच्या संपर्कातील ६ लाख ५८ हजार ८७१ जणांचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात आला आहे. त्यात १ लाख ५६ हजार १०५ जण हायरिस्कमध्ये आढळून आले. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, दुसरीकडे गृहविलगीकरणातील व्यक्ती बिनधास्त घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी एप्रिलच्या सुरुवातीस संपूर्ण जिल्हाभरातील गृहविलगीकरणातील व्यक्तींशी थेट संपर्क साधण्याच्या सूचना केल्या होत्या. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व प्रशासकीय कर्मचा-यांनी होम आयसोलेशनमधील बाधितांचा शोध घेतला असता काहीजण सापडलेच नाहीत.
दरम्यान, बुधवारपर्यंत लातूर शहर महापालिकेअंतर्गत १९ हजार ८७३ बाधितांची नोंद झाली असून त्यात सध्या ४ हजार ८२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महापालिका हद्द वगळता अन्य जिल्हाभरात २८ हजार ६८२ बाधितांची नोंद झाली असून सध्या ८ हजार १९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या : ४८५५५
ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या : २८६८२
होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण : ९७३८
गावामध्ये वॉच कोणाचा...
गृहविलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबादारी आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून सातत्याने लक्ष केंद्रित करण्यात येते. परंतु, इतरांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे, काही जणांचे मोबाईल क्रमांकही लागत नसल्याचे यापूर्वीच्या पाहणीत आढळून आले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर...
जिल्हा आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शहरी भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे संसर्ग वाढत आहे.
हायरिस्कमधील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करुन घेतली जात आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे...
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गृहविलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासह शिक्षक, ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.