कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:38+5:302020-12-29T04:18:38+5:30
लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरत्या वर्षात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही महिने जनजीवन ...

कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट
लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरत्या वर्षात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने अतुलनीय कार्य केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख आणि प्रशासनाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली. त्यामुळेच लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेची निर्मिती झाली. याशिवाय, कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचे मोठे दोन टँक उभारण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्यांदा काेरोनाबाधितांची नोंद झाली. त्यानंतर संसर्ग वाढत राहिला. अशा परिस्थितीत सर्वोपचार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता सलग ७ महिने अवितरत आरोग्य सेवा देत संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या. कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्यात नेहमीच राज्यात अग्रस्थानी राहिला. विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेमुळे पुणे, मुंबईतील चाचण्या लातुरात उपलब्ध होत आहेत.
लातुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा लाभ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात झाला. विशेष म्हणजे, अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच या इमारतीचा वापर करण्यात आला.
वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता प्रभारीच...
वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. गिरीश ठाकूर होते. मात्र, जुलैमध्ये त्यांची अंबाजोगाई येथे प्रभारी अधिष्ठाता म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी औरंगाबादच्या घाटीतील डॉ. मोहन डोईबळे यांची नियुक्ती झाली. दरम्यान, ठाकूर यांनी शासनाकडे अडचणी मांडल्या. त्यामुळे ते येथेच काही दिवस कान-नाक- घसा तज्ज्ञ म्हणून राहिले. त्यानंतर त्यांची अलिबागच्या शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून बदली झाली. उपअधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांची महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
ग्रामपंचायतींकडून सक्षमीकरण...
वांजरवाडा, अतनूर, खरोळा, हलगरा, हेर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची देश पातळीवर निवड होऊन मानांकन मिळाले. हरंगुळ खु. येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राने राज्यात प्रथम क्रमाकांची मोहोर उमटविली. १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी गावातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रास दोन कोटींचे आरोग्य साहित्य उपलब्ध करून दिले.
डॉ. संजय ढगे यांची पदोन्नती...
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांची हिवताप आणि हत्तीरोग निर्मूलन विभागाच्या सहाय्यक संचालकपदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी मुरुडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख यांची नियुक्ती झाली. उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.