कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमाच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:31+5:302021-05-04T04:09:31+5:30
गतवर्षी जून महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले होते. वाढत्या रुग्णांमध्ये आरोग्यसेवेवरही ताण येत होता. त्यामुळे राज्य शासनाने कोविड- ...

कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमाच नाही !
गतवर्षी जून महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले होते. वाढत्या रुग्णांमध्ये आरोग्यसेवेवरही ताण येत होता. त्यामुळे राज्य शासनाने कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डाॅक्टर, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, स्टोअर ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कक्षसेवक, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार, सुरक्षारक्षक अशा विविध पदांवर शैक्षणिक अर्हता, अनुभव, गुणवत्तेनुसार कंत्राटी, हंगामी व रोजंदारी पद्धतीने भरती केली होती. जिल्ह्यात असे सुमारे ५५० च्या जवळपास कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाकाळात दिवसरात्र रुग्णसेवा केली आहे. रुग्णांची सेवा बजावत असतानाच अनेक जणांना कोरोनाची लागणही होत आहे. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर पुन्हा कर्मचारी ड्युटी करीत आहेत. मागील महिनाभरापासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना ८ ते १२ तासांची ड्युटी करावी लागत आहे. असे असतानाही शासनाकडून त्यांना तीन महिन्यांकरिता नियुक्ती दिली जात आहे. शिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स काढण्यात आलेला नाही. गतवर्षी रुग्ण वाढू लागल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून ३ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात रुग्ण कमी झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर कमी करण्यात आले. मात्र, मार्च महिन्यापासून रुग्ण वाढत असल्याने कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नियुक्ती देण्यात आली आहे.
आतापर्यंत ५० हून अधिक पॉझिटिव्ह...
जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या गतवर्षी ३५० च्या जवळपास होती. यावर्षी ही संख्या सुमारे ५५० इतकी झाली आहे. यातील ५० हून अधिक कर्मचारी सेवा बजावत असताना पॉझिटव्ह आले आहेत. रुग्णांची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना केवळ तीन महिन्यांच्या कंत्राटावर सेवा बजावावी लागत आहे.
शासकीय सेवेत सामावून घ्या...
कोरोनाकाळात आरोग्य विभागात रिक्त पदे असताना शासनाचे कार्यमुक्ती, पुनर्नियुक्तीचे धोरण आरोग्यसेवेच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी नियुक्ती देऊन नियमित करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्यानंतर अनेकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा तीन महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात आली आहे. - अभिनय सूर्यवंशी
जून महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कंत्राटी कर्मचारी म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये ड्युटी होती. दर तीन महिन्यानंतर तीन महिन्यांची नियुक्ती देण्यात येत आहे. शासनाने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे. -डॉ. पूजा पाटील
रुग्ण वाढू लागल्याने कामाचा ताणही वाढला आहे. ८ तासांची ड्युटी करावी लागत आहे. त्यातच तीन महिने कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त केले जात आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्यावे. त्यासोबतच विमा देण्यात यावा. -डॉ. नेहा येरमे
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे कंत्राट...
कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे कंत्राट आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सेवा खंडित करण्यात आली. आता रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा कंत्राटी पद्धतीने भरती केले आहे. कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमाकवच द्यावे, भत्ता लागू करावा, आरोग्य भरतीत प्राधान्य द्यावे, ११ महिन्यांची ऑर्डर द्यावी, शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही कंत्राटी कर्मचारी ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे.