सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने एकूण ७०० कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये १२ फिजिशियन, दोन भूलतज्ज्ञ, ३५ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, एमडी), ४६ दंतचिकित्सक, १३ वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद), रुग्णालय व्यवस्थापक एक, स्टाफ नर्स २९१, लॅब टेक्निशियन ५१, ईसीजी टेक्निशियन ८, एक्सरे टेक्निशियन १५, औषध निर्माता २३, बीईओ २८, वॉर्डबॉय १७५ असे एकूण ७०० कर्मचारी ४ जून २०२१ पर्यंत नियुक्त करण्यात आले होते. मात्र सध्या कोराची रुग्णसंख्या घटल्याने यातील ४४८ जणांची सेवा थांबविण्यात आली आहे, जर तिसरी लाट आली आणि शासनाचे आदेश आले तरच त्यांना पुन्हा नियुक्ती दिली जाणार आहे. कोरोनाचा उच्चांक असताना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत फिजिशियन ४, भूलतज्ज्ञ ०, वैद्यकीय अधिकारी ३६ (एमबीबीएस), दंतचिकित्सक ०, वैद्यकीय अधिकारी १ (आयुर्वेद), रुग्णालय व्यवस्थापक १, स्टाफनर्स ८७, लॅब टेक्निशियन २६, ईसीजी टेक्निशियन ५, एक्सरे टेक्निशियन ७, औषध निर्माता १०, बीईओ १६, वॉर्डबॉय ५९ असे एकूण २५२ कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, सामान्य रुग्णालय उदगीर, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, अरुणअभय ओसवाल उदगीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा तोंडार पाटी नांदेडरोड उदगीर, राजमाता गर्ल्स हॉस्टेल उदगीर, ग्रामीण रुग्णालय औसा, अहमदपूर, मुरुड, रेणापूर, चाकूर, बाभळगाव, देवणी, जळकोट, किल्लारी, कासारशिरसी आणि वूमन्स हॉस्पिटल लातूर, शिरूर ताजबंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत.
खासगी ३५ दवाखाने झाले बंद
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात ८५ खासगी रुग्णालयांना परवानगी होती. मात्र सध्या रुग्णसंख्या घटल्यामुळे अनेकजण परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज करीत आहेत. त्यानुसार ३५ जणांची परवानगी मान्य करून त्या दवाखान्यातील कोरोना रुग्ण सेवा बंद झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.
रुग्णसंख्या घटल्यामुळे सेवा संपुष्टात
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्यात आली आहे. सध्या २५२ कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णसेवा आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर सेवा थांबविलेल्यांना पुन्हा परत सेवेत घेतले जाईल.
- डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक