सर्वप्रकारची दुकाने सुरु झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:21+5:302021-06-05T04:15:21+5:30
चापोली : कोरोनाच्या संकटामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले होते. तब्बल ४० ...

सर्वप्रकारची दुकाने सुरु झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा
चापोली : कोरोनाच्या संकटामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले होते. तब्बल ४० दिवसांनी नियमांत शिथिलता देण्यात आल्याने सर्व दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. नागरिकांची विविध खरेदीसाठी रेलचेल सुरु झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ४० दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे छोटे व्यावसायिक मेटाकुटीस आले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे निर्माण झाला होता. तसेच दुकानातील कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यापुढेही मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून निर्बंध शिथील केले. ४० दिवसानंतर व्यावसायिकांना आपली दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदारांसह कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल सुरु झाली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर व्यवसायासाठी दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, हा वेळ कमी असल्याने व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.