अहमदपुरात कोरोनाचा आलेख घसरल्याने नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:48+5:302021-05-21T04:20:48+5:30

अहमदपूर : तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. मात्र १ मे पासून ते १८ पर्यंतच्या कालावधीत रुग्ण वाढीचा ...

Consolation to the citizens as the graph of corona has dropped in Ahmedpur | अहमदपुरात कोरोनाचा आलेख घसरल्याने नागरिकांना दिलासा

अहमदपुरात कोरोनाचा आलेख घसरल्याने नागरिकांना दिलासा

अहमदपूर : तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. मात्र १ मे पासून ते १८ पर्यंतच्या कालावधीत रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. १८ दिवसांत एकूण १६९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्याही घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला होता. शहरामध्ये दररोज १५० च्या पुढे रुग्ण आढळून येत होते. परिणामी, खाटा मिळणेही अवघड झाले होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

१८ दिवसांत शहरात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. शहरात १६ मे रोजी एकही पॉझिटिव्ह आला नाही. मागील पाच दिवसात ही संख्या पाचच्या आत आली होती. १८ मे रोजी केवळ ५ रुग्ण शहरात आढळल्याची नोंद आहे. होम क्वारंटाईन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

कडक निर्बंधामुळे घट...

ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपासून बाधितांची संख्या घटली आहे. शहरात आता जवळपास केवळ ५ रुग्ण आढळून येत आहेत. शहरात अद्यापही निर्बंध कायम असून त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १० रुग्ण आहेत.

शहरात ४३ पॉझिटिव्ह रुग्ण...

शहरात १० ते १८ मे या कालावधीत केवळ ४३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. १० मे रोजी ५, ११ रोजी २, १२ रोजी १४, १३ रोजी ३, १४ रोजी ८, १५ रोजी ४, १६ रोजी ०, १७ रोजी २, १८ रोजी ५ पॉझिटिव्ह आढळले. या कालावधीत शहरात एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ग्रामीणमध्ये १४५ पॉझिटिव्ह...

तालुक्यातील ग्रामीण भागात १० ते १८ मे या कालावधीत एकूण १४५ पॉझिटिव्ह आढळले आहेत. १० रोजी २८, ११ रोजी ८, १२ रोजी १७, १३ रोजी २३, १४ रोजी १९, १५ रोजी १५, १६ रोजी ७, १७ रोजी १९, १८ मे रोजी ९ पॉझिटिव्ह

आढळले आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी...

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांना काळजी घ्यावी. शासन नियमांचे पालन करावे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा. विनामास्क घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. फिजिकल डिस्टन्स राखावा, नेहमी हात स्वच्छ धुवावे. कुठलीही लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत.

- डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.

Web Title: Consolation to the citizens as the graph of corona has dropped in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.