हातावर पोट असलेले मजूर, व्यावसायिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:13+5:302021-05-01T04:18:13+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत ...

हातावर पोट असलेले मजूर, व्यावसायिकांचे हाल
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी केली आहे. तसेच दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किराणा साहित्य, भाजीपाला खरेदीची समस्या दूर झाली आहे. एक अडचण दूर झाली असली तरी छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसमोर संकट उभे आहे. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी भ्रांत मजुरांना पडली आहे. आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या दुकानदारांसमोरही संकट उभे राहिले आहे.
शासनाने छोटे व्यावसायिक, बारा बलुतेदारांना उदरनिर्वाहासाठी मासिक पाच हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. बारा बुलतेदारांसह गावोगावी जाऊन कपडे विक्री करणारे, भाजीपाला विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे. संचारबंदीमुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही.
एकाच ठिकाणी शिवभोजन...
तालुक्यात जळकोट येथे एकाच ठिकाणी शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील काहीजणांना त्याचा लाभ होत आहे. मात्र, वाडी- तांड्यावरील नागरिकांनी काय करावे, असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. छोट्या व्यावसायिकांना आणि मजुरांना मासिक ५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी जळकोट तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, हरिभाऊ राठोड, खादरभाई लाटवाले, आयुब शेख, शिरीष चव्हाण, मनोहर वाकळे, सत्यवान पांडे, सत्यवान पाटील दळवे, राजू पाटील, बालाजी आगलावे, संजय आडे, संग्राम कदम, बालाजी गुडसुरे, सरपंच दत्ता घोणसीकर आदींनी केली आहे.