मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे दहा दिवसांत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:40+5:302021-05-27T04:21:40+5:30
मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. बैठकीस उपायुक्त मंजूषा गुरमे यांच्यासह आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत ...

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे दहा दिवसांत पूर्ण करा
मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. बैठकीस उपायुक्त मंजूषा गुरमे यांच्यासह आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे तसेच विविध अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले, शहरातील प्रत्येक प्रभागातील नाल्यांची स्वच्छता झाली पाहिजे. प्रत्येक कॉलनी तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजूस असणाऱ्या गटारींचीही स्वच्छता करणे आवश्यक आहे. वर्तविलेल्या अंदाजानुसार नियोजित वेळेत पाऊस पडला तर पुन्हा नालेसफाईची कामे करता येणार नाहीत. मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेकडे स्वच्छता विभागात उपलब्ध असणाऱ्या पूर्ण मनुष्यबळाचा व यंत्रसामग्रीचा वापर करून स्वच्छता करून घ्यावी. सखल भागातील नाल्यांच्या सफाईकडे विशेष लक्ष द्यावे. गटारी तुंबल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहणार नाही याची दक्षता घ्यावी. गटारीमध्ये कचरा अडकून राहिला तर पाणी रस्त्यावर येते. थोडाही अधिक पाऊस झाला तर गटारीचे पाणी सखल भागातील घरामध्ये शिरते. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. आगामी पावसाळ्यात गटारी तुंबल्याच्या तक्रारी येऊ नयेत याची स्वच्छता विभागाने काळजी घ्यावी. त्यासाठी आगामी दहा दिवसांत नालेसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देशही त्यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात गटारी तुंबल्याच्या व घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांना तक्रार करण्यासाठी, पालिकेला कळविण्यासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.