पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:17+5:302021-08-20T04:25:17+5:30
खंडाळी मंडळात पावसामुळे नुकसान खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी मंडळामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंडळातील खंडाळी, नागझरी, ...

पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी
खंडाळी मंडळात पावसामुळे नुकसान
खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी मंडळामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंडळातील खंडाळी, नागझरी, उजना, सांगवी, गंगाहिप्परगा, सुमठाणा, धसवाडी, जोडवाडी, वंजारवाडी आदी गावांतील पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने खंड दिला होता. मात्र, आता मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागात बसेस सुरू करा
अहमदपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एसटी बसेस शहरासाठी धावत आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून होत आहे.
प्रा. आरेफ शेख यांना पीएच.डी. प्रदान
लातूर : येथील प्रा. आरेफ पाशामियाँ शेख यांना स्वारातीम विद्यापीठाने इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान केली. त्यांनी डॉ. आर.डी. कांबळे, डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल डॉ. आर.सी. जाधव, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. दीपक ननावरे, किल्लारीच्या शहीद भगतसिंग महाविद्यालयाचे डॉ. संदीप चव्हाण, सिनेट सदस्य रविकिरण गळगे, आसिफ शेख आदींनी कौतुक केले.
रयतू बाजार परिसरात अस्वच्छता
लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणा-या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. या परिसरातील अस्वच्छतेबाबत मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.