लातूरात मनपाची शहर बससेवा सहा दिवसांपासून बंद; विद्यार्थी, महिला प्रवाशांचे हाल

By आशपाक पठाण | Published: April 2, 2024 04:59 PM2024-04-02T16:59:46+5:302024-04-02T17:00:10+5:30

महिलांच्या मोफत प्रवासाचे बिल महापालिका एजन्सीला देते. मात्र, वर्षभरापासून एक रुपयाही मनपाने दिला नाही.

City bus service of Latur municipality closed for six days; Plight of students, women passengers | लातूरात मनपाची शहर बससेवा सहा दिवसांपासून बंद; विद्यार्थी, महिला प्रवाशांचे हाल

लातूरात मनपाची शहर बससेवा सहा दिवसांपासून बंद; विद्यार्थी, महिला प्रवाशांचे हाल

लातूर : लातूर शहर महापालिकेची परिवहन सेवा मागील सहा दिवसांपासून बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. परिवहन सेवा देणाऱ्या एजन्सीने थकीत बिलासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सहा दिवसांपासून महापालिका प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

लातूर शहर महापालिकेकडून १५ सप्टेंबर, २०२२ पासून शहराच्या हद्दीत महिलांना सिटी बसमध्ये मोफत प्रवास देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिलांची चांगली सोय झाली, शिवाय सिटीबसमध्ये ऑटोरिक्षांच्या तुलनेत घेतले जाणारे प्रवासभाडे जवळपास निम्मेच आहे. यामुळेच शहर बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद उदंड आहे. खासगी एजन्सीमार्फत चालविली जाणारी बससेवा मागील सहा दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची ओरड वाढली आहे. लातूर शहरात दिवसभरात २१ बसेसच्या माध्यमातून दररोज २०० ते २४० फेऱ्या विविध मार्गांवर होत होत्या. दिवसभरात प्रवास करणाऱ्यांची संख्या १५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

महिलांच्या मोफत प्रवासाचे देयक...
महिलांना मोफत प्रवासाचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर एजन्सीने त्याची अंमलबजावणी केली. जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मोफत प्रवास केलेल्या महिलांचे प्रवास भाडे महापालिकेने अद्यापपर्यंत दिले नाही. वर्षभरात किमान दहा वेळा स्मरणपत्र देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने २८ मार्चपासून शहर बससेवा चालविणाऱ्या एजन्सीने आयुक्तांना पत्र देऊन जोपर्यंत थकित बिल मिळणार नाही, तोपर्यंत बससेवा बंद ठेवावी लागणार असल्याचे नमूद केले आहे.

मनपा, एजन्सीत तोडगा निघेना...
महिलांच्या मोफत प्रवासाचे बिल महापालिका एजन्सीला देते. मात्र, वर्षभरापासून एक रुपयाही मनपाने दिला नाही. बस खरेदी करण्याकरिता बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. बँकेचे हप्ते थकल्याने वारंवार नोटिसा येत आहेत. त्यामुळे लवकर बिल मिळावे, यासाठी एजन्सीने पत्रात म्हटले आहे. या संदर्भात मनपा आयुक्त आणि एजन्सीची बैठक झाली, परंतु यात मार्ग निघाला नाही. परिणामी, शहर बससेवा बंद पडली आहे.

मनपाकडे निधीची अडचण...
महिलांच्या मोफत प्रवासाचे जवळपास १५ महिन्यांपासून बिल थकीत आहे. याची रक्कम दोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. मात्र, महापालिकेकडे निधीची अडचण असल्याने एवढी रक्कम एकदाच देणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. एजन्सी थकीत बिलासाठी ठाम असल्याने तोडगा कधी निघणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

शहर बससेवा लवकर सुरू व्हावी...
ऑटोरिक्षांचे प्रवास भाडे अनेकांना परवडणारे नाही. कष्टकरी, मजूर महिला, विद्यार्थिनींना मोफत बससेवेचा चांगला आधार होता. सहा दिवसांपासून बस बंद असल्याने हाल होत आहेत. महापालिकने तत्काळ बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Web Title: City bus service of Latur municipality closed for six days; Plight of students, women passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.