स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:36+5:302021-02-08T04:17:36+5:30
अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ...

स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा
अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ये-जा करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात स्वच्छतागृह नसल्याने बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
अहमदपूर पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. शहरातील भाजी मार्केट परिसर, कराडनगर, चंद्रभागानगर, हाजी सत्तारखाँ कॉलनी, नागोबानगर, हनुमान टेकडी परिसर, मिरकलेनगर, भाग्यनगरातील काही भाग, श्रीनगर, अराफत कॉलनी, पाशाखाँ कॉलनी, उमरनगर, खाटिक गल्ली, इंदिरानगर, शंकरनगर, मौलालीनगर, चौंडानगर, भारत कॉलनी, गिरिजा गार्डन आदी ठिकाणी रस्ते, नाल्यांसह स्वच्छतागृह नसल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील बसस्थानक परिसर, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, आझाद चौक, सराफलाइन, शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरातही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. पालिका शहरातील व्यापाऱ्यांकडून कर वसूल करते. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
एकाच ठिकाणी स्वच्छतागृह...
अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज १२४ गावांसह वाडी-तांड्यांतील नागरिक येथे येत असतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे लघुशंका अथवा शौचास जावे लागल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात एकाच ठिकाणी स्वच्छतागृह असून ते कधी बंद तर कधी चालू असते. पालिकेने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांतून होत आहे.
जागा हस्तांतरणाची प्रतीक्षा...
शहरातील बसस्थानकासमोर सुलभ शौचालय उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली असून जागा हस्तांतरित होताच शौचालयाची उभारणी करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.