मरण झाले स्वस्त, ९८७ नागरिकांचा बळी; साडेतीन वर्षांत झाले २ हजार ६९ अपघात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:17+5:302021-06-27T04:14:17+5:30
लातूर : काेराेना महामारीने सर्व व्यवहार ठप्पच आहेत. अनेकांच्या राेजगारावर संक्रांत आली आहे. तर गतिमान प्रवासाने गत साडेतीन वर्षांत ...

मरण झाले स्वस्त, ९८७ नागरिकांचा बळी; साडेतीन वर्षांत झाले २ हजार ६९ अपघात !
लातूर : काेराेना महामारीने सर्व व्यवहार ठप्पच आहेत. अनेकांच्या राेजगारावर संक्रांत आली आहे. तर गतिमान प्रवासाने गत साडेतीन वर्षांत तब्बल ९८७ नागरिकांचा बळी घेतला आहे. २०१८ ते मे २०२१ अखेर एकूण २ हजार ६९ रस्ता अपघातांच्या घटना घडल्या असून, मरण स्वस्त झाले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये ६३३ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २४६ जणांचा मृत्यू तर ४२३ जण जखमी झाल्याची नाेंद आहे. २०१९ मध्ये ६४१ अपघातांत २९० जणांचा मृत्यू तर ३९८ जण जखमी झाले आहेत. २०२० मध्ये ५१५ अपघात झाले आहेत. यात २५१ जणांचा मृत्यू झाला तर ३०८ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते मे २०२१ अखेर २८० अपघाताच्या घटनांची नाेंद आहे. यात १२५ जणांचा मृत्यू झाला असून, १७३ जण जखमी झाले आहेत. यामध्ये पहिल्या लाॅकडाऊन २०२० मध्ये २२ मार्च ते ३१ मे या काळात ५७ अपघाताच्या घटना घडल्या. यात २९ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या लाॅकडाऊन २०२१ मध्ये मार्च ते ३१ मे या काळात १०८ अपघात झाले आहेत. यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला तर ७३ जण जखमी झाले आहेत. हे सर्व अपघात लातूर जिल्ह्यातील विविध मार्गांवर झाले आहेत.
वेळ माैल्यवान, पण जीवनही अमूल्य...
अपघातानंतर दिनचर्या बदलली. जीवन अमूल्य आहे. हे अपघाताच्या घटनेनंतर समजले. पण थाेडक्यात बालंबाल बचावलाे. वाहनांची गती हीच अपघाताला निमंत्रण देते. रस्त्यावरील नियमांचे पालन आणि गतीवरील नियंत्रण हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मरण स्वस्त झाल्याचा अनुभव अपघातातून आला.
- संभाजी वाढवणकर, उदगीर
वाहतुकीच्या नियमांचे पालन प्रामुख्याने हाेत नाही. जे वाहनधारक नियमांचे पालन करून वाहन चालवतात, त्यांना समाेरच्या वाहनधारकाचा बेदरकारपणा भाेवताे. यातूनच अपघाताच्या घटना घडतात. कुठलीही चूक नसताना अपघाताला सामाेरे जावे लागते. रस्त्यावरून जाताना सर्वांनीच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे़ हेच अपघातानंतर समजले.
- साहेबराव कांबळे, किनी
लाॅकडाऊनमध्ये अपघाताचे प्रमाण घटले...
काेराेना काळात लातूर जिल्ह्यातील अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे समाेर आले आहे. मात्र, लाॅकडाऊननंतर पुन्हा या अपघाताच्या आकडेवारीत वाढ झाली. २०२८ ते मे २०२१ अखेर लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर तब्बल २ हजार ६९ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासन, पाेलीस दलाच्यावतीने अपघात राेखण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. प्रामुख्याने प्रबाेधन, जनजागृती केली जात आहे़. मात्र, वाहनांचा वेग आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे सदरचे अपघात हाेत असल्याचे समाेर आले आहे.
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धाेका...
लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर वाहनांचे अपघात हाेत असले तरी, पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धाेका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत़ परिणामी, पादचाऱ्यांनाही अशा भरधाव वाहनांचा धाेका असल्याचे समाेर आले आहे.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश...
अपघातात चालकांचे नियंत्रण सुटणे, वाहन भरधाव चालविणे, चालक मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. राॅंग साईडबराेबर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हेच कारण अपघाताला कारणीभूत ठरले आहे. बहुतांश अपघातात तरुणांचा बळी गेल्याचे समाेर आले आहे. यात दुचाकीच्या अपघाताचाही टक्का माेठा आहे.
अपघात प्रवणक्षेत्रात वाहने चालवा सावकाश...
जिल्ह्यात काही मार्गावर ब्लॅक स्पाॅट आहेत. शिवाय, रस्ता जम्पिंगचा आहे. यातूनच अनेकदा वाहन भरधाव असल्याने उलटणे, दुसऱ्या वाहनांवर आदळणे अशा अपघाताचे प्रकार हाेतात. यामध्ये माेठ्या प्रमाणावर वाहनाचे नुकसान आणि प्राणहानीही हाेते. यासाठी वळणदार रस्ते, अरुंद पूल, ब्लॅक स्पाॅट येथून वाहन काळजीपूर्वक आणि सावकाश चालवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणे जीवावर बेतणारे आहे.