गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:05 IST2019-01-25T20:03:48+5:302019-01-25T20:05:20+5:30
प्रजासत्ताक दिनानिम्मित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांच्याशी संवाद

गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास परिवर्तन
लातूर : आपली लोकशाही जगाला आदर्श असून प्रजासत्ताकदिनी युवकांनी आपापल्या गावच्या विकासासाठी योगदान देण्याचा निश्चय केला पाहिजे़ प्रामाणिकपणे गावासाठी परिश्रम घेतले तरच परिवर्तनाची गती वाढेल, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले़
प्रजासत्ताकदिनानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष झाला़ परंतु, आज संघर्षाचा काळ राहिला नाही, हे युवकांनी जाणून घेतले पाहिजे़ ग्रामीण भागाचा विकास हा सर्वात मोठा प्रश्न आहे़ ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी चांगले रस्ते, घरोघरी शौचालय, साक्षरता वाढविणे गरजेचे आहे़ कर्तव्यापासून दूर होत राहिलो तर विकास होणे अशक्य आहे़ त्यामुळे आम्ही गाव, देशासाठी काय करतो, याचा विचार केला पाहिजे़ अनेकजण कुठलेही काम न करता केवळ शासनाकडे मागण्या करीत असल्याचे दिसते़ परंतु, या मागण्या पूर्ण कशा होतील? हे पाहिले जात नाही़ प्रत्येकाला गरजा असतात़ परंतु, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे़ शहरकर गुरुजी म्हणाले, युवा पिढी ही वाचन संस्कृतीपासून दूर चालली आहे़ त्याचबरोबर आज शाळेतही शालेय अभ्यासक्रमाशिवाय अन्य ज्ञान दिले जात नाही, हे चिंतनीय आहे़
पत्नीसोबत केले रस्त्याचे काम़
सन १९५५ मध्ये माझा विवाह झाला़ तेव्हा एस़एम़ जोशी यांनी उन्हाळ्यात राष्ट्रसेवा दलामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखुर्डा ते उस्मानाबादला जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा मार्ग तयार करण्यासाठी आपण दोघांनी यावे, असे सांगितले़ तेव्हा आम्ही दोघांनी तिथे २१ दिवस श्रमदान करीत रस्ता तयार केला़ याशिवाय, १९५७ मध्ये महाळंग्रा ते अहमदपूरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या मार्गासाठीही श्रमदान केल्याचे जीवनधर शहरकर गुरुजी यांनी सांगितले़