वाळू उपशाला विरोध केल्यास चांदाेरी-येळणूर रस्ता खाेदणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:48+5:302021-02-14T04:18:48+5:30
निलंगा तालुक्यातील चांदोरी गावच्या शिवारातून तेरणा नदी वाहते. येथे निलंगा तालुक्यातून दररोज २५ ते ३० ट्रॅक्टर दिवस-रात्र वाळूचा मोठ्या ...

वाळू उपशाला विरोध केल्यास चांदाेरी-येळणूर रस्ता खाेदणार
निलंगा तालुक्यातील चांदोरी गावच्या शिवारातून तेरणा नदी वाहते. येथे निलंगा तालुक्यातून दररोज २५ ते ३० ट्रॅक्टर दिवस-रात्र वाळूचा मोठ्या प्रमाणामध्ये उपसा करत आहेत. वाळूउपसा करण्यासाठी जेसीबी यंत्राचा वापर केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्या माफियांना जाब विचारला असता, आम्ही प्रशासनामध्ये पैसे भरले असल्याची उत्तरे देऊन वाळू उपशाला विरोध केलात तर तुम्हाला बघून घेऊ अशी धमकीच ते देत आहेत. एवढेच नाही तर चांदोरी-येळणूर हा रस्ता जेसीबी यंत्राद्वारे खोदून टाकू, असा दमच त्यांनी विराेध करणाऱ्या ग्रामस्थांना भरला आहे. यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे हे ट्रॅक्टरवाले येताना खडक घेऊन येतात व नदीकाठी रस्ता तयार करून नदीमध्ये बांध घालून वाळू उपसा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी सरपंच विजय साळुंके, विठ्ठल सोळंके, प्रवीण सोळुंके, गोविंद सोळुंके, शाहूराज सोळुंके, सुनील सोळुंके आदीसह ग्रामस्थांनी वाळू माफियाला आज हाकलून दिले. मात्र या वाळूमाफियांनी चांदोरी- येळणूर जाणारा रस्ता खोदून टाकू मग तुम्ही येथून कसे जातात हेच पाहतो असा दम देत तूर्तास गावातून काढता पाय घेतला आहे. निलंगा येथील तालुका प्रशासनाने तातडीने वाळू माफियाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वाळूमाफियांचा कायमचा बंदोबस्त करू, अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.