चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयातील निवासस्थानाची झाली पडझड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:04+5:302021-06-21T04:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकूर : चाकुरातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. इमारतीची पडझड झाली असून, ...

चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयातील निवासस्थानाची झाली पडझड !
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकूर : चाकुरातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. इमारतीची पडझड झाली असून, छताला बुरशी आली आहे तर दरवाजे, खिडक्याही मोडल्या आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच याठिकाणी रहावे लागत आहे. विशेष म्हणजे या इमारतीत राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वजबाबदारीवर राहावे, असे पत्र देण्यात आले आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक यांना प्रत्येकी एक, वैद्यकीय अधिकारी ३, कनिष्ठ लिपीक २, नेत्रचिकित्सक अधिकारी १, औषधनिर्माण अधिकारी २, क्ष-किरण तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी १, सहाय्यक १, अधिपरिचारिका ७, कक्षसेवक ४, सफाईदार २ अशी एकूण २७ पदे मंजूर आहेत. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी म्हणून वर्ग १, २, ३ आणि वर्ग ४ चे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाच्या परिसरात १६ निवासस्थाने बांधण्यात आली. वैद्यकीय अधीक्षकांचे निवासस्थानही पूर्णत: खराब झाले आहे. येथील छत गळत असून तिथे कोणीही राहात नाही. तूर्तास या इमारतीत प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.
तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची स्थितीही अशीच आहे. त्यापैकी दोन निवासस्थानांत वैद्यकीय अधिकारी राहतात. १९८५मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले. सध्या छताला तडे गेल्याने पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे तिथे बुरशी लागली आहे. वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी दोन मजली इमारतीत ८ फ्लॅट आहेत. ही इमारत जीर्ण झाली आहे. छत गळते. दारे-खिडक्याही मोडल्या आहेत. स्वच्छतागृह कालबाह्य झाले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी जीव मुठीत धरून येथे राहून आरोग्यसेवा देतात.
ही इमारत राहण्यासाठी अयोग्य आहे, असे वैद्यकीय अधीक्षकांनी लेखी पत्र देऊन कळवले आहे. तुम्ही येथे राहणार असाल तर स्वजबाबदारीवर राहा, असे या पत्रात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी कुटुंबासह याठिकाणी राहात आहेत. दरम्यान, या परिसरात वराहांचा वावर वाढला आहे. या संदर्भात नगर पंचायतीला वर्षभरापूर्वी पत्र दिले आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.
सन १९८२मध्ये येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले. त्यापूर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्यामुळे कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारली नाही. त्यामुळे इमारती अपुऱ्या पडत आहेत. एका निवासस्थानातील अपुऱ्या जागेत वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय सुरु आहे. निवासस्थानाचे ऑडिट करण्यात यावे म्हणून वैद्यकीय अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला २६ ऑगस्ट २०१९, १ जुलै २०१९ आणि ४ सप्टेंबर २०१९ला पत्र दिले. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या इमारतीचे ऑडिट केलेले नाही.
इमारतींचे ऑडिट गरजेचे...
ग्रामीण रुग्णालय परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतींचे ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला हवे. त्यासाठी त्यांना लेखी पत्र दिले आहे. प्रथमदर्शनी इमारती खराब झाल्याने कर्मचाऱ्यांना लेखी कळविण्यात आले आहे. येथे नव्याने निवासस्थाने उभारण्याची गरज आहे.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.
नवीन निवासस्थाने व्हावीत...
ग्रामीण रुग्णालयातील इमारतीचे ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करुन अहवाल द्यावा. तसेच रुग्णसेवा देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन धोरणानुसार निवासस्थाने व्हावीत. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने पुढाकार घेतला जाईल.
- गुणवंत पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना.
निवासस्थानांची अवस्था बिकट...
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. अक्षरशः कर्मचारी जीव धोक्यात घालून येथे राहतात. शासनाने त्यांची विनाविलंब पर्यायी व्यवस्था करावी तसेच आवश्यकतेनुसार नवीन निवासस्थाने उभारावीत.
- ॲड. संतोष माने, नगरसेवक.