चाकुरातील शवदाहिनीस गळती, नातेवाइकांचे सातत्याने हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:56+5:302021-08-27T04:23:56+5:30

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. ...

Chakura's crematorium leaks, relatives' constant condition! | चाकुरातील शवदाहिनीस गळती, नातेवाइकांचे सातत्याने हाल!

चाकुरातील शवदाहिनीस गळती, नातेवाइकांचे सातत्याने हाल!

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी शेडच्या मध्यभागातून पेटलेल्या चितेवर पाणी पडत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांना थांबण्यासाठी आसराही उपलब्ध नाही.

शहरातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार सोमवारी रात्री ९ वा. च्या सुमारास येथील सार्वजनिक स्मशानभूमीत गेले. स्मशानभूमीत प्रेतावर सरण रचण्यात आले. त्यानंतर भडाग्नी देण्यात आला. तेव्हा, मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या धारा या शेडच्या मध्यभागातून शवदाहिनीत पडत होत्या. त्यामुळे पेटलेली चिता विझणार की काय, अशी भीती निर्माण झाल्याने एकाने चितेवर पाणी पडू नये, म्हणून त्यावर टोपले धरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढला आणि पेटलेल्या चितेवर पाणी पडू लागले. स्मशानभूमीत थांबण्यासाठी आसराही नसल्याने नातेवाइकांची कसरत होऊ लागली. त्यामुळे नातेवाईक पावसात थांबून मृतदेह पूर्णपणे जाळण्याचा प्रयत्न करीत होते. पावसाचे पाणी चितेवर पडू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्याच्या हाताला आगीची झळ बसली.

सन २००७ मध्ये स्मशानभूमीत पत्र्याची शवदाहिनी करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या काळात सिमेंट काँक्रिटची शवदाहिनी तयार करण्यात आली. या शववाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे मुश्कील ठरत आहे. सन २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. परंतु, शवदाहिनीकडे अद्यापपर्यंत लक्ष देण्यात आले नाही.

पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जमा झालेल्या नागरिकांना थांबण्यासाठी शेडही उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नातेवाइकांतून संताप व्यक्त होत आहे. किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येईल...

सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे. शवदाहिनीच्या वरच्या भागातून पाणी गळते. त्याची तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. नवीन शवदाहिनीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत.

Web Title: Chakura's crematorium leaks, relatives' constant condition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.