उजनीत शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:28+5:302021-02-07T04:18:28+5:30
गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास ...

उजनीत शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन
गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास सांगण्यात आले होते. परंतु , जनजागृतीचा अभाव तसेच शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते पावसामुळे बंद झाल्यामुळे आणि मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करता आली नाही. दरम्यान, कृषी आयुक्तांनी जे शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकले नाहीत, त्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केला तरी तो दाखल करून घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे शेतकरी जेव्हा ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा कंपनीने अर्ज स्वीकारले नाहीत.
औसा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऑफलाईन अर्ज कंपनीकडून स्वीकारला गेला नाही. जे शेतकरी काढणी पश्चात ऑफलाईन अथवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या आंदोलनात वांगजी, चिंचोली, वडजी, आशिव येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
शेतकऱ्यांना न्याय द्यावा...
पीक विमा कंपनी जाचक अटी लावून शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यापासून वगळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. शासन आणि पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अजिंक्य शिंदे यांनी केली आहे.