राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण
By हरी मोकाशे | Updated: February 5, 2024 17:21 IST2024-02-05T17:21:16+5:302024-02-05T17:21:50+5:30
शासनाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी

राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण
लातूर : राजपूत समाजातील नागरिकांना कुठल्याही अडथळ्याविना सरसकट जात प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी क्षत्रिय राजपूत महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
क्षत्रिय राजपूत महासभेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, सचिव धीरज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राजपूत ही जात विमुक्त जाती व्हीजे-डीटी १ या प्रवर्गात येते. मात्र, जात प्रमाणपत्र व पडताळणीवेळी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी अनावश्यक व जाचक पुरावे मागितले जातात. परंतु, हे पुरावे सादर करणे शक्य होत नाही. परिणामी, आरक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. राजपूत समाजातील सर्वांना सरसकट जात प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच शासनाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. त्याची लवकरात लवकर स्थापना करण्यात यावी आणि समाजातील गरजू घटकास लाभ देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.