लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
दरम्यान, छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, जोपर्यंत सूरज चव्हाण यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. रविवारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना लातूरच्या विश्रामगृहात बेदम मारहाण झाली होती. तत्पूर्वी पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकत निवेदन दिले होते.
मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी
लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर या वादावर सूरज चव्हाण यांनी जाहीर माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. घडलेला प्रकार दुर्देवी असून तो घडायला नको होता असं सांगून त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सूरज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी सांगितले.