लोणच्यासाठी परराज्यातील कैरी, गृहिणींची सुरु झाली लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:17+5:302021-06-05T04:15:17+5:30
अहमदपूर : येथील बाजारपेठेत लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महिलांची खरेदीसाठी गर्दी होत असून, लोणचे तयार ...

लोणच्यासाठी परराज्यातील कैरी, गृहिणींची सुरु झाली लगबग
अहमदपूर : येथील बाजारपेठेत लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महिलांची खरेदीसाठी गर्दी होत असून, लोणचे तयार करण्याची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आंब्याचे लोणचे तयार करण्यात येते. यंदाही लोणचे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. राज्याबरोबरच परराज्यातील विविध ठिकाणच्या कैऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला जेवणाच्या ताटात हवेहवेसे वाटणारे चटकदार कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु आहे. त्यासाठी आवश्यक असलेले हळद, तेल, मीठ, हिंग, मोहरीचे पीठ, मसाल्याची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या येथील बाजारपेठेत लोणच्यासाठीची कैरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. घरोघरी गृहिणी लोणचे तयार करत आहेत. त्यामुळे लोणच्याच्या कैऱ्यांना मागणी वाढली आहे. दर्जा, आकारानुसार दर आकारण्यात येत आहे. साधारणत: ४० ते ५० रुपये किलो दराने कैरी उपलब्ध आहे. कैरीच्या फोडीसाठी २० रुपये प्रति किलो असा दर आहे. बाजारातून आणलेली कैरी घरी स्वच्छ पाण्यात टाकली जाते व दुसऱ्या दिवशी धुवून फोडणी दिली जाते. त्यानंतर हळद, मीठ, हिंग, तेल व मसाला तयार टाकून लोणचे तयार केले जात आहे. लोणचे ठेवण्यासाठी चिनीमातीच्या बरणीचा उपयोग केला जातो. त्यामुळे या कालावधीत चिनी मातीच्या बरणीला मागणी आहे.
यंदा दर उतरले...
गेल्यावर्षी कैरीचे भाव ६० ते ७० रुपये किलो असे होते. मात्र, यावर्षी कैरीचे दर कमी झाले आहेत. महाराष्ट्रासह हैदराबाद, रायचुट्टी, दामणचूर, तिरुपती, बेंगलोर, श्रीनिवासपूर, कृष्णानगरी आदी ठिकाणहून कैऱ्या मागविल्या जात आहेत, असे येथील फळविक्रेते जावेद फकीरसाब बागवान यांनी सांगितले.