औषधी वनस्पतींसह १ हजार २१३ वृक्षांचे संगोपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:11+5:302021-06-05T04:15:11+5:30
अहमदपूर : कोरोनाच्या संसर्गामुळे काही रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागला. त्यामुळे वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले. येथील ...

औषधी वनस्पतींसह १ हजार २१३ वृक्षांचे संगोपन
अहमदपूर : कोरोनाच्या संसर्गामुळे काही रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागला. त्यामुळे वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाने राजमाता जिजाऊ उद्यान निर्माण केले असून तिथे विविध प्रकारच्या वनौषधींसह १ हजार २१३ वृक्षांची जोपासना केली आहे. त्यामुळे हे उद्यान बहरले आहे.
शहरातील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन राजमाता जिजाऊ उद्यान साकारले आहे. या उद्यानाच्या संगोपन आणि संरक्षणाची जबाबदारी महाविद्यालयातील रासेयोवर सोपविण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचीही मदत होत आहे. महाविद्यालयात प्रवेश केल्याक्षणी विद्यार्थी, पालक, अभ्यागतांचे लक्ष उद्यानाकडे वेधले जाते आणि काही वेळ ते उद्यानात स्वतःला हरवून जातात.
या राजमाता जिजाऊ उद्यानात आवळ्याची ३, गुलमोहर २, अशोका ४५, नोनी १, सदाफुली ३९१, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे ४१, मोरपंखी १०, स्वस्तिक ५, नंदिनी १, बोगनवेल ६५, सप्तपर्णी १, चाफा ३, पैताड २, पारिजातक ३, कुंदा ४, नारळ ४, निळ्या फुलांच्या वेली ४, बॉटल पाम १५, रॉयल पाम ९, पायकस ३५, बदाम २, बाड ३४३, कोरफड ११, इलायची २, अडुळसा २, निलगिरी २, करंजी ११, टिकुमा ४०, कदंब १, पिंपळ १, जास्वंद ३, लिंबुनी १, तुळशी १२७ अशी एकूण १ हजार २१३ रोपांची लागवड करण्यात आली आहे.
मागील वर्षी १ हजार १४३ रोपे होती. त्यातील २० वृक्षांची नैसर्गिक बदलामुळे घट झाली, तर नवीन ८० रोपांची लागवड करण्यात आली. सध्या महाविद्यालय परिसरात १ हजार २१३ वृक्ष असल्याची माहिती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी दिली. नोनी, कोरफड, अडुळसा, इलायची, पिंपळ, जास्वंद, लिंबोणी, तुळस, निलगिरी, सदाफुली, बेल आणि आवळा अशा एकूण १२ प्रकारच्या औषधी वृक्षांच्या जाती उद्यानात आहेत.
३५ प्रकाराची वेगवेगळी रोपे...
महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ उद्यानात विविध औषधी वनस्पतींसह ३५ प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यांचे संगोपन एनएसएसचे विद्यार्थी करतात. महाविद्यालयाचा परिसर हरित करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी प्रयत्नशील आहेत. शंकर डोंगरे हे वेळोवेळी वृक्षसंगोपनासंदर्भात मार्गदर्शन करतात.
- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार.
अभिनव उपक्रमांवर भर...
महाविद्यालयाच्यावतीने अभिनव उपक्रमांवर भर देण्यात येताे. राजमाता जिजाऊ उद्यानाच्या निर्मितीमुळे महाविद्यालयाचा परिसर हा ऑक्सिजनपूरक हरित होत आहे, असे रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी सांगितले.