पांढरवाडी ओढ्यावरील पूल पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:10+5:302021-07-01T04:15:10+5:30
शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील पांढरवाडी ओढ्यावरील दीड कोटी खर्चाच्या बाॅक्स सेल पुलाचे काम पूर्णत्वाला गेले असून, पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा ...

पांढरवाडी ओढ्यावरील पूल पूर्णत्वाकडे
शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील पांढरवाडी ओढ्यावरील दीड कोटी खर्चाच्या बाॅक्स सेल पुलाचे काम पूर्णत्वाला गेले असून, पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून महिनाभरात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.
शिरुर अनंतपाळ-उदगीर राज्यमार्गावरील पांढरवाडी गावाच्या ओढ्यावर पाझर तलाव बांधण्यात आला आहे. पाझर तलावाच्या सांडव्यावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी दोन फूट उंचीचा सिमेंट पाईपचा पूल बांधण्यात आला होता. परंतु, थोडाही पाऊस पडला तरी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे शिरुर अनंतपाळ-उदगीर राज्यमार्गावरील वाहतूक तासन्तास ठप्प होत होती. त्यामुळे पांढरवाडीच्या या ओढ्यावर मोठा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक दिवसापासून करण्यात येत होती. राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी म्हणून येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने बाॅक्स सेल पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले होते. महिनाभरात या पुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे गेले आहे.
पावसाळ्यातील वाहतुकीचा अडसर दूर...
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने या बाॅक्स सेल पुलाचे बांधकाम करण्यासाठी बांधकामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार पुलाच्या बांधकामास गती देण्यात आली. महिनाभरात पुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे गेले असल्याचे येथील बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाला असून, राज्य मार्गावरील वाहतुकीस अडचण होऊ नये म्हणून लवकरच पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.